37th National Games Goa 2023 Maharashtra Crossed 150 Medals Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत पदकांचे दीडशतक ओलांडले आहे. जलतरण, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, कुस्तीमधील पदकांच्या बळावर महाराष्ट्राने आतापर्यंत 60 सुवर्ण, 48 रौप्य आणि 53 कांस्यपदकांसह एकूण 161 पदके जिंकत पदकतालिकेतील अग्रस्थान टिकवलं आहे. तर यामध्ये सेनादल दुसऱ्या स्थानावर आणि हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे. 

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकले. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य आणि एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राने टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली. रोल बॉलमध्ये महाराष्ट्र महिला  संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला.  तर पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या तायक्वांदोपटूंनी तीन कांस्य तर नंदिनी साळोखेने कुस्तीमधील 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

जलतरण स्पर्धेत दुहेरी धमाका

महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकून जलतरणामध्ये ‘दुहेरी धमाका’ साजरा केला. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य आणि एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. ऑलिम्पिकपटू वीरधवलने 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.60 सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली. त्यानेच 2015मध्ये  नोंदवलेला 24.73 सेकंद हा विक्रम मोडला. बुधवारी त्याने 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकून वेगवान जलतरणपटूचा मान मिळवला होता. याच शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा मिहीर आंम्ब्रेने वीरधवलच्या पाठोपाठ ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत 24.67 सेकंदांत पार करीत रौप्यपदक जिंकले. 

पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने 57.37 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. या शर्यतीत ऑलिम्पिकपटू श्रीहरी नटराजन हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या 100 मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या पलक जोशीने सोनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर 01.05.29 सेकंदात पार केलं. याआधी तिने या स्पर्धेत 200 मीटर्स बॅकस्टोक शर्यतीचेही विजेतेपद मिळवलं होतं. 50 मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत मात्र ऋजुता खाडेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर 28.38 सेकंदांत पार केलं. याआधी तिने या स्पर्धेत 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली होती. 

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये विजयी मालिका कायम ठेवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वॉटरपोलोमधील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. पुरुष गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीनंतर केरळ संघावर 6-4 अशी मात केली. महाराष्ट्र संघाकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये गौरव महाजनी आणि पियुष सूर्यवंशी यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. केरळ संघाने शेवटच्या डावात दोन गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती.  मात्र महाराष्ट्राने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पश्चिम बंगालबरोबर सामना होणार आहे. 
महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर 165-7 असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून राजश्री गुगळे आणि पूजा कुंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची केरळ संघाशी गाठ पडणार आहे. दोन्ही गटांचे उपांत्य सामने शुक्रवारी होणार आहेत.

टेबल टेनिसमध्येही लक्षणीय कामगिरी 

दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राने गुरुवारी टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली.

रोल बॉलमध्ये सुवर्ण कामगिरी 

श्वेता कदमच्या कुशल नेतृत्वासह महेक राऊत, अक्षता आणि स्नेहल पाटीलने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रोल बॉलमधील सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला. पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले.महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीमध्ये राजस्थानचा 5-2 असा पराभव केला. महाराष्ट्र पुरुष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राजस्थान संघाने महाराष्ट्रावर 7-5 अशी मात केली.  

अ‍ॅथलेटिक्समध्ये 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत  रुपेरी यश

महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या 800  मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. तिने हे अंतर 2 मिनिटे, 3.24 सेकंदात पार केले. दिल्लीची खेळाडू के. एम. चंदाने सुवर्णपदक जिंकले. तिला हे अंतर पार करण्यासाठी 2 मिनिटे, 1.74 सेकंद वेळ लागला. ॲथलेटिक्समधीलच 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या जय शहाचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. त्याला हे अंतर पार करण्यासाठी 21.17 सेकंद वेळ लागला. 

तायक्वांदो महाराष्ट्राला तीन कांस्य पदके

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने गुरुवारी तीन कांस्य पदके पटकावली.  महाराष्ट्राकडून प्रसाद पाटील, भारती मोरे आणि मृणाल वैद्य यांनी कांस्य पदके मिळवली. 

महिलांच्या कुस्ती स्पर्धेत नंदिनी साळोखेला कांस्यपदक

महाराष्ट्राच्या नंदिनी साळोखेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमधील 50 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. या गटातील पहिल्या फेरीत तिने दिल्लीच्या दीपिकाचा 6-0 असा पराभव केला. पाठोपाठ तिने बिहारच्या रेशमी कुमारीवर निर्णायक विजय मिळवला. मात्र उपांत्य फेरीत तिला शिवानी पवार या मध्य प्रदेश या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत नंदिनीने मनप्रीतवर निर्णायक विजय मिळवला. 

फुटबॉलमध्ये महाराष्ट्राचा मेघालयवर विजय

महाराष्ट्राच्या फुटबॉल संघाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात मेघालय संघावर 2-1 असा दणदणीत विजय संपादन केला. मनदीप सिंग आणि अद्वैत शिंदे यांनी गोल करून महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राकडून मनदीपने 13व्या मिनिटाला आणि अद्वैतने 23व्या मिनिटाला गोल केले. मुख्य प्रशिक्षक डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने याआधीच्या सामन्यात गतउपविजेत्या केरळला 2-2 असे बरोबरीत रोखले होते.

हॉकीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाचा झारखंडकडून पराभव

महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झारखंडकडून 0-3 असा पराभव पत्करला. झारखंडच्या  विजयात अलबेला राणी टोप्पोच्या दोन गोलचे महत्त्वाचे योगदान ठरले. पेड्डीम क्रीडा संकुलाच्या हॉकी मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत ब-गटातील या सामन्यात प्रमोदीनी लाक्राने चौथ्याच मिनिटाला मैदानी गोलद्वारे झारखंडचे खाते उघडले. त्यामुळे अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचा संघ दडपणाखाली खेळला. मग दुसऱ्या सत्रात  21व्या मिनिटाला अलबेलाने झारखंडची आघाडी 2-0 अशी वाढवली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आले. चौथ्या सत्रात 58व्या मिनिटाला अलबेलाने दुसरा वैयक्तिक गोल नोंदवून झारखंडची आघाडी 3-0 अशी केली. महाराष्ट्राने मंगळवारी झालेल्या  पहिल्या सामन्यात यजमान गोव्याला 2-1 अशी धूळ चारली होती. महाराष्ट्राचा पुढील सामना शनिवारी पंजाबशी होणार आहे.

रीकर्व्हमधील दोन सांघिक पदकांवर महाराष्ट्राची दावेदारी

महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या रीकर्व्ह तिरंदाजी क्रीडा प्रकारात अनुक्रमे सुवर्ण  आणि कांस्य पदकांसाठी दावेदारी मजबूत केली आहे. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने यजमान गोव्याला 6-0 असे नमवले. मग दुसऱ्या सामन्यात आसामचा 6-2 असा पराभव केला. यशदीप भोगे, शुकमनी बाबरेकर,  सुमेध मोहोड, गौरव लांबे यांचा समावेश असलेला महाराष्ट्राचा संघ 6 नोव्हेंबरला झारखंडशी जेतेपदासाठी भिडणार आहे. 

हेही वाचा : 

37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची सोनेरी हॅट्ट्रिक, खाडे पती-पत्नीची मुलखावेगळी कामगिरी

[ad_2]

Related posts