[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पणजी : ‘ह्या वेळी २०० पार’ या निर्धाराने उतरलेल्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील पदकांचे ऐतिहासिक द्विशतक साकारले. महाराष्ट्राच्या युवा शिलेदारांच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे राज्याची शान देशभरात उंचावली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मंगळवारी १३व्या दिवशी प्रामुख्याने ट्रायथलॉन, कबड्डी, कयाकिंग या क्रीडा प्रकारांत पदके मिळाली. पदकतालिकेतील अग्रस्थानावर पहिल्या दिवसांपासून विराजमान असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यावर ७० सुवर्ण, ६४ रौप्य, ६९ कांस्यपदकांसह एकूण २०३ पदके आहेत. सेनादल (५५ सुवर्ण, २४ रौप्य, ३३ कांस्य, एकूण ११२ पदके) दुसऱ्या आणि हरयाणा (५० सुवर्ण, ४१ रौप्य, ५५ कांस्य, एकूण १४६ पदके) तिसऱ्या स्थानावर आहेत.
ट्रायथलॉन शर्यतीमधील मिश्र रिले विभागात महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले आहे. महिलांच्या वैयक्तिक विभागात याआधी सोनेरी यश मिळवणाऱ्या मानसी मोहितेचे या पदकातही महत्त्वाचे योगदान होते. योगासने क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या वैभव श्रीरामेने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. बॉक्सिंगमध्ये ऋषिकेश आणि यश गौड बंधूंनी कांस्यपदकांची कमाई केली. कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कयाकिंग शर्यतीमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवी रायकवारने कांस्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी अनुक्रमे केरळ आणि कर्नाटकचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी महाराष्ट्राचे दोन्ही संघ ओडिशाशी सुवर्णपदकासाठी झुंजतील. हॉकीमध्ये अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे सुवर्णस्वप्न भंगले. कर्नाटकने ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. बीच हँडबॉल क्रीडा प्रकारातील अखेरच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने केरळविरुद्ध ९-११, १०-१३ असा निसटता पराभव पत्करला. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. ज्युदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला दोन कांस्यपदकांची हुलकावणी मिळाली.
ट्रायथलॉन – महाराष्ट्राला सुवर्णपदक
महाराष्ट्राने ट्रायथलॉन शर्यतीमधील मिश्र रिले विभागात सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राच्या खात्यावर आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. याआधी महाराष्ट्राच्या मानसी मोहितेने महिलांच्या वैयक्तिक विभागात सोनेरी कामगिरी केली होती.
आजही मानसीने पार्थ मिरगे, संजना जोशी व कौशिक माळंडकर यांच्या साथीने महाराष्ट्राला मिश्र रिले विभागात विजेतेपद मिळवून दिले. या शर्यतीमध्ये ३०० मीटर्स जलतरण, ७.५ किलोमीटर सायकलिंग व दोन किलोमीटर धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी १ तास, ५१ मिनिटे, १९ सेकंदात हे अंतर पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. या गटात तामिळनाडू संघाला रौप्य आणि मध्य प्रदेश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदकांची आतापर्यंत कमाई केली आहे.
योगासने – वैभव श्रीरामेला सुवर्ण
महाराष्ट्राच्या वैभव श्रीरामेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या योगासने क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. कलात्मक योगासनांच्या एकेरीमध्ये त्याने ही किमया साधली. निकालाबाबत आक्षेप घेतल्याने तो जाहीर् करण्यास विलंब झाला. कल्याणी चुटेने कलात्मक एकेरीत रौप्य पदक जिंकले होते. मात्र याबाबत आक्षेप घेतल्याने त्याची पडताळणी करण्यात आली. यात तिने हे पदक गमावले.
—
कबड्डी – महाराष्ट्राच्या पुरुष संघाला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने उपांत्य सामन्यात हरयाणाकडून २९-३९ असा पराभव पत्करल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कॅम्पाबेल मल्टपर्पज क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत हरयाणाने १२व्या मिनिटाला महाराष्ट्रावर पहिला लोण देत १८-११ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला २०-१६ अशी नाममात्र आघाडी हरयाणाकडे होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत ती ३३-२२ अशी वाढवली. महाराष्ट्राला हरयाणावर लोण देण्याची नामकी संधी आली होती. मैदानावर शिलकी तीन खेळाडू होते आणि अजय नरवालची तिसरी चढाई होती. या चढाईत त्याने अरकमला टिपले व त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूची पकड झाली. त्यामुळे तो होणारा लोण हरयाणाने वाचवला. महाराष्ट्राच्या शंकर गदई व किरण मगर यांनी एक-एक अशा दोन अव्वल पकडी केल्या. पण त्याचे रुपांतर विजयात करता आले नाही. महाराष्ट्राकडून अस्लम शेख, आदित्य शिंदे, आकाश शिंदे, किरण मगर, शंकर गदई यांनी संघाचा पराभव टाळण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेनादलाने चंदीगड ४९-२५ असे नमवत अंतिम फेरीत धडक दिली. सेनादलविरुद्ध हरयाणा अशी पुरुषांत, तर हिमाचल प्रदेश विरुद्ध हरयाणा अशी महिलांत अंतिम लढत होईल. महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये यंदा एकच कांस्यपदक मिळवता आले. महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान सोमवारी साखळीतच संपुष्टात आले. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने दोन्ही गटांत रौप्यपदके पटकावली होती.
कयाकिंग -जान्हवी रायकवारला कांस्य
महाराष्ट्राच्या जान्हवी रायकवारने कयाकिंग शर्यतीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. तिने ही शर्यत १ मिनिट, ३३.५० सेकंदांत पार केले. या क्रीडा प्रकारात खेळाडूंना एक किलोमीटर अंतरामध्ये वेगवेगळे अडथळे पार करावयाचे असतात. तिने गतवर्षी खेलो इंडिया स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते. ती अमरावती येथील खेळाडू असून बारावी शास्त्र शाखेत ती शिकत आहे. कनोइंगमधील एक हजार मीटर्स अंतराच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या हेमंत हिरे व साद पटेल यांनी चौथा क्रमांक पटकावला.
बॉक्सिंग -गौड बंधूंना कांस्यपदके
ऋषिकेश आणि यश गौड बंधूंनी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खात्यावर दोन पदके जमा झाली.
पेड्डीम मल्टिपर्पज इनडोअर स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पर्धेतील पुरुषांच्या ५४-५७ किलो किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात ऋषिकेशने हिमाचल प्रदेशच्या आशीष कुमारकडून ०-५ असा पराभव पत्करला. याचप्रमाणे ६० ते ६३.५ वजनी गटाच्या उपांत्य फेरीत यश गोव्याच्या आकाश गोरखाविरुद्ध ०-५ असा पराभूत झाला.
खो-खो – महाराष्ट्राचे दोन्ही संघ सुवर्णपदकांपासून एक पाऊल दूर
महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खो-खो संघांनी अनुक्रमे केरळ आणि कर्नाटकचा धुव्वा उडवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. बुधवारी महाराष्ट्राचे दोन्ही संघ ओडिशाशी सुवर्णपदकासाठी झुंजतील. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र महिला संघाने कर्नाटकचा ५४-३० असा २४ गुणांनी मोठा पराभव केला. मध्यंतराला महाराष्ट्राकडे ३२-१४ अशी भक्कम आघाडी होती. महाराष्ट्राकडून प्रियंका इंगळेने २.३० मि. संरक्षण करत १० गुणांची कमाई केली. काजल भोरने १.१० मि. संरक्षण करून ८ गुण मिळवले. प्रीती काळेने नाबाद २.२० मि. संरक्षण केले तर पूजा फरगडेने ८ गुण मिळवले. रेश्मा राठोडने नाबाद २.००, १.२० मि. संरक्षण करताना २ गुण संपादन केले. कर्नाटककडून वीणा एम.ने १.४० मि. तर मोनिकाने १.०५, १.४० मि. संरक्षण करत ४ गुण संपादन केले. दुसऱ्या उपांत्य सामनात ओडिशाने केरळचा ६४-३० असा एकतर्फी ३४ गुणांनी पराभव केला. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने केरळवर ६८-२४ असा ४६ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात संरक्षण करताना अपयशी ठरलेल्या लक्ष्मण गवसने दुसऱ्या गावात १.०० मि. संरक्षण करीत आक्रमणामध्ये तब्बल १६ गुणांची कमाई करत केरळचा बचाव भेदून टाकला. रामजी कश्यपणे २.२० मि. संरक्षण करत आक्रमणात ६ गुणांची कमाई केली, तर सौरभ घाडगेने १.०० मि. संरक्षण करताना आक्रमणामध्ये ४ गुण मिळवले. आदित्य गणपुलेने २.२० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले. केरळकडून निखिलने १.०० मि. संरक्षण करत आक्रमणात २ गुण तर विसाद एस.ने १.१०० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. पुरुष गटाच्या अन्य उपांत्य सामन्यात ओडिशा संघाने आंध्र प्रदेशवर ४४-४२ असा २ गुणांनी निसटता विजय संपादन केला.
हॉकी – अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे महाराष्ट्र पराभूत
जुगराज सिंगच्या हॅट्ट्रिकच्या बळावर महाराष्ट्र कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण अखेरच्या सहा मिनिटांत कर्नाटकने तीन गोल नोंदवल्यामुळे युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे हे स्वप्न भंगले. कर्नाटकने ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला. आता महाराष्ट्राचा संघ बुधवारी उत्तर प्रदेशशी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. पेड्डीम क्रीडा संकुलाच्या मैदानावर चालू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात जुगराजने दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यामुळे पहिल्या सत्रात महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती. २८व्या मिनिटाला चंदना अल्याना निक्कीनने मैदानी गोल करीत मध्यंतराला कर्नाटकला १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रात जुगराजने ३२व्या आणि ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन लागोपाठ गोल करीत हॅट्ट्रिक साकारली. ३८व्या मिनिटाला शिशा गौडा बीएमने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने कर्नाटकचा दुसरा गोल झळकावला. पण ४०व्या मिनिटाला वेंकटेश केंचेच्या गोलमुळे महाराष्ट्राकडे ४-२ अशी आघाडी होती. पण अखेरचे सत्र अपेक्षाभंग करणारे ठरले. शिशाने ५५व्या आणि ५७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन सलग गोल करीत आपली हॅट्ट्रिक साकारली आणि कर्नाटकला बरोबरीही साधून दिली. ५९व्या मिनिटाला अभरान सुदेव बी. याने नोंदवलेला मैदानी गोल कर्नाटकसाठी निर्णायक ठरला. याच गोलने महाराष्ट्राच्या अंतिम फेरी गाठण्याच्या वाटचालीपुढे पूर्णविराम दिला.
बीच हँडबॉल – महाराष्ट्राचा केरळविरुद्ध निसटता पराभव
महाराष्ट्राने बीच हँडबॉल क्रीडा प्रकारातील अखेरच्या साखळी सामन्यात केरळविरुद्ध ९-११, १०-१३ असा निसटता पराभव पत्करला. परंतु तरीही उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. हा सामना बुधवारी होईल. महाराष्ट्राकडून बिना कडकुंभर्गे आणि स्वप्नजा मुरबाडे यांनी अप्रतिम खेळ केला.
नेमबाजी – महाराष्ट्राच्या सोनम मस्करला अंतिम फेरीत सहावा क्रमांक
महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या सोनम मस्करला सहावा क्रमांक मिळाला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत अजूनही महाराष्ट्राला पदक पटकावता आलेले नाही.
सोनमला अंतिम फेरीत एकूण १६५.९ गुण मिळाले. सोनमने पात्रता फेरीत ६२८.१ गुण मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्राची आणखी एक स्पर्धेक अनन्या नायडू (६२७.१ गुण) अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली. या स्पर्धेत पश्चिम बंगालच्या मेहुली घोषला सुवर्ण, हरयाणाच्या नॅन्सीला रौप्य आणि बंगालच्या स्वाती चौधरीला कांस्यपदक मिळाले.
ज्युदो – दोन कांस्यपदकांची हुलकावणी
ज्युदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला दोन कांस्यपदकांची हुलकावणी मिळाली. त्यामुळे ज्युदोमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अद्याप एकही पदक जमा होऊ शकले नाही.
५२ वर्षांखालील वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या श्रद्धा चोपडेने मध्य प्रदेशच्या संध्या तिवारीकडून पराभव पत्करला. तर ६३ वर्षांखालील वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राच्या स्नेहल खवरेने दिल्लीच्या स्टॅनझिन दायचीनकडून हार पत्करली.
—-
महाराष्ट्राची पदके – दिनांक ६ नोव्हेंबर
योगासने
वैभव श्रीरामे – सुवर्णपदक
ट्रायथलॉन
मिश्र रिले संघ – सुवर्णपदक
बॉक्सिंग
ऋषिकेश गौड – कांस्यपदक
यश गौड – कांस्यपदक
कयाकिंग
जान्हवी रायकवार – कांस्यपदक
कबड्डी
पुरुष संघ – कांस्यपदक
एकूण पदके
सुवर्ण : ७०
रौप्य : ६४
कांस्य : ६९
एकूण : २०३
[ad_2]