[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shiv Sena Clash : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांच्यात तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याच्या घटना समोर येत असतात. अशातच आज त्यात आता महाडची (Mahad) भर पडली आहे. शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याविरोधातील ठाकरे गटाचा मोर्चा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावरून दोन्ही बाजूंनी हमरीतुमरी होऊन बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आणखी चिघळली नाही. या घटनेनंतर आता थंडीत महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे.
महाडमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडल्याने परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं आहे. आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्यावरून या दोन्ही गटात जुंपली. नागपूर अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा राडा झाल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भरत गोगावले यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आता वर गेले आहेत. त्यांचे मत जाणून घ्यायचे असेल तर कोणाला तरी वर जावं लागेल’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाडमधील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते. त्यावेळी हा राडा झाला. तब्बल दीड तास हा राडा सुरू होता.
दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुकी करत होते. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येलाही राडा
याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला होता. यावेळी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.
[ad_2]