Nagpur News mahalakshmi saras sales exhibition 2024 from february 16 to 26 in nagpur information by girish mahajan maharashtra marathi news( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nagpur News नागपूर : मुंबई (Mumbai) येथील ‘महालक्ष्मी सरस’ 2034-24 (Mahalakshmi Saras) ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर (Nagpur News) येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. येत्या 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत उपराजधानी नागपुरात ‘महालक्ष्मी सरस’ (Mahalakshmi Saras) चे आयोजन केले असून याला नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी आशा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केली आहे. 

16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यस्तरावर , विभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. सन 2004 पासून ग्रामविकास विभागांतर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री आणि प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागच्या वेळी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत 26 डिसेंबर 2023 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत बीकेसी मुंबई येथे 19 वे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मुंबई आणि परिसरातून विक्रमी प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर आता नागपूरला येत्या 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत महालक्ष्मी सरसचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यामध्ये  एकूण 250 स्टॉल असतील यामध्ये 100 खाद्यपदार्थांचे आणि 150 इतर स्टॉल्स असतील, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

हक्काची बाजारपेठ

महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी आणि ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समूहांतील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादने, विक्री आणि बाजारपेठेची माहिती देणे, राज्या-राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती आणि कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल ग्रामीण भागातील वस्तू/पदार्थ उपलब्ध करुन देणे हा असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

नागपूर येथील सरसच्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयंसहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला  चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मुंबईच्या सरसमध्ये हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असल्याच्या भावना मुंबईकरांनी व्यक्त केल्या होत्या. त्याच हेतूने नागपूर शहरात हे प्रदर्शन आयोजित केल्यामुळे नागपूरकरांनाही हा अनुभव मिळणार आहे. महालक्ष्मी सरस हा आता विश्वासार्ह ब्रँड झाला आहे. या प्रदर्शनातून गुणवत्ता, दर्जा आणि शुद्धता त्याचबरोबर वाजवी दर यासाठी उमेद अभियानाकडून बारकाईने कार्यवाही केली जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन देखील गिरीश महाजन यांनी केले आहे.

63 लाखापेक्षा जास्त महिलांचा सहभाग 

राज्यभरातील विविध भागांतील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानीच मिळणार आहे. राज्यस्तरावरील महालक्ष्मी प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत यामुळे  अभियानाला प्रचार व प्रसिद्धी तसेच महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल.

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरिता सन 2011 पासून ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे देखील मंत्री महाजन म्हणाले.

या अभियानांतर्गत महिलांच्या उपजीविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 6 लाख 39 हजार 291 स्वयंसहायता समूह, 30 हजार 767  ग्रामसंघ, 1 हजार 850 प्रभागसंघ, 307 महिला शेतकरी उत्पादक कंपनी आणि 10 हजार 714 उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. 63 लाखापेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला या पूर्वीपासूनच पारंपरिक आणि अपांरपरिक अशा शेती आधारित आणि बिगर शेती आधारित व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभियानातील बहुतांशी महिलांनी यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे आणि विविध उत्पादनांची निर्मिती करीत असल्याची माहिती महाजन यांनी बोलतांना दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

Related posts