[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडू आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला आहे. या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने एमओए क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
बैठकीत महाराष्ट्राच्या गेल्या वर्षभरातील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा आढावा घेऊन यशस्वी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात बोलताना सरचिटणीस नामदेव शिरगांवकर म्हणाले, या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने राज्य क्रीडा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय मान्य करण्यात आला असून, महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि खेळाच्या संघटनांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना प्रायोजक आणि कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उभा केला जाईल. पुरस्कार सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना, राज्य संघटना, सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला), सर्वोत्कृष्ट्र क्रीडा मार्गदर्शक (पुरुष, महिला) यांचा समावेश असेल, अशी माहितीही शिरगांवकर यांनी या वेळी दिली. त्याचबरोबर बैठकीत दोन संघटनांमध्ये वाद राहू नये यासाठी प्रयत्न केले जातील. पण, त्यानंतरही वाद न्यायालयात गेला, तर ऑलिम्पिक संघटनेशी संलंग्न असणाऱ्या संघटनेने होणारा न्यायालयीन खर्च सहन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन व ऑलिम्पिक म्यूझियम इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याठिकाणी देशातील पहिलं ऑलिम्पिक म्युझियम विकसित होत आहे, याचा आनंद आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ७२ कोटी… pic.twitter.com/xieO0dCDxr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 11, 2024
राज्यातील क्रीडा गुणवत्ता अधिक प्रगल्भ करण्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक तयार करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याचाही पुढे आलेला विचार मान्य करण्यात आला. विविध संघटनांचे वाद टाळण्यासाठी संघटना आणि क्रीडा आयुक्तालय यांच्याशी समन्वय राखण्याचे ठरवण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासन, क्रीडा आयुक्तालय आणि क्रीडा संघटना यांच्यात समन्वय राहिल याची काळजी घेण्याची सूचना केली. त्याचबरोबर महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनाचा उपयोग कसा केला जावा, तेथे काय असावे याबाबतही अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. लक्ष्यवेध ही योजनाही कशी ताकदीने राबवता येईल याकडे लक्ष द्यावे आणि यात सुधारणा आवश्यक असल्यास संघटना आणि क्रीडा आयुक्त यांच्याशी चर्चा करून पुनर्रचना करावी. या योजनेतून संघटना दूर राहता कामा नयेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
अधिक पाहा..
[ad_2]