NCP MLA disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार! राष्ट्रवादीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष( प्रगत भारत । pragatbharat.com)

NCP MLA disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्र सुनावणी निकाल 15 तारखेला दिला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे. दुसरीकडे, शरद पवारांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह (Ajit Pawar group got party and symbol) मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीही चर्चा रंगली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव मिळालं आहे. तीन पर्यायांमधून हे नाव मिळालं आहे. 

वटवृक्ष चिन्हासाठी पवार गट आग्रही

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे.  येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

– महाराष्ट्रातील 41आमदार 
– नागालँडमधील 7 आमदार 
– झारखंड 1 आमदार 
– लोकसभा खासदार 2
– महाराष्ट्र विधानपरिषद 5 
– राज्यसभा 1 

शरद पवारांसोबत किती आमदार? 

– महाराष्ट्रातील आमदार 15 
– केरळमधील आमदार 1
– लोकसभा खासदार 4 
– महाराष्ट्र विधानपरिषद 4
– राज्यसभा – 3

दुसरीकडे, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिल्यानंतर या निकालाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केलेल्या निकषांचं उल्लंघन करून निवडणूक आयोगानं हा निकाल दिल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आयोगानं कुठल्या निकषांच्या आधारावर अजित पवार गटाला पक्षनाव न चिन्ह देण्याचा निर्णय घेतला? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Related posts