[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
18 October In History : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 18 ऑक्टोबर या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे. विजेचा बल्बसह अनेक शोध लावणारे संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याशिवाय अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या डिस्प्रेड क्लास मिशनचा आज स्थापना दिन आहे. अभिनेते ओम पुरी यांचा जन्मदिन ही आज आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरलेला चंदन आणि हस्तिदंताची तस्करी करणारा कुख्यात तस्कर वीरप्पन 18 ऑक्टोबर 2004 रोजी चकमकीत ठार झाला होता.
1871 : पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन.
चार्ल्स बॅबेज हे इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी आणि यांत्रिकी अभियंता होते. बॅबेज यांना संगणकाची कल्पना प्रथम सुचली. पण त्यांच्या जीवनकालात ते आपल्या कल्पनेस आकार देऊ शकले नाहीत. लंडनच्या वस्तु संग्रहालयात त्यांच्या अपूर्ण संगणकाचे भाग प्रदर्शनास ठेवले आहेत. 1991 साली चार्ल्स बॅबेज यांच्या कल्पनेतील डिफरन्स इंजिनची यशस्वी प्रतिकृती तयार करण्यात आली.
बॅबेजनी रेल्वे-इंजिनसमोर येणारे अडथळे दूर करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या धातूच्या चौकटीचा (pilot / cow-catcher) शोध लावला. रेल्वेमार्गाच्या कार्यक्षमतेच्या विविध पैलूंचे मोजमाप आणि देखभाल करण्यासाठी त्यांनी शक्तिपी वाहन तयार केले.
अंतर पद्धतीच्या (Differences Method) सहाय्याने बहुपदीय गणिते सोडवण्यासाठी बॅबेज यांनी रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीसमोर डिफरन्स इंजिन प्रस्तुत केले. मूल्यांच्या मालिकेची स्वयंचलित गणना करण्यासाठी त्यांनी हे यंत्र तयार केले. मर्यादित फरकाची पद्धत वापरल्यामुळे गुणाकार आणि भागाकार करणे शक्य झाले. यंत्राच्या अनेक घटक-भागांची रचना आणि जुळणी त्यांनी स्वतः केली. तसेच ‘नोट ऑन द ॲप्लिकेशन ऑफ मशिनरी टू द कंप्युटेशन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल अँड मॅथेमॅटिकल टेबल्स’ हा शोधनिबंध त्यांनी सादर केला. गणितीय आणि खगोलशास्त्रीय सारण्यांची गणना करण्यासाठी शोध लावलेल्या त्यांच्या यंत्रासाठी त्यांना रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले.
1906 : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
शोषित, पीडित आणि दलितांच्या विकासाचे ध्येय ठेवून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 18 ऑक्टोबर 1906 रोजी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून संस्थेचे कामकाज सुरू होते. डिप्रेस्ड क्लास मिशनकडे 1912 पर्यंत चार राज्यांमध्ये जवळपास 23 शाळा आणि 5 वसतिगृहे होती. अस्पृश्यतेचा प्रश्न अखिल भारतीय स्तरावर मांडण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे सतत प्रयत्न करत होते. त्या काळात जिथे जिथे काँग्रेसच्या बैठका होत तिथे शिंदे ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’चे अधिवेशन भरवत असत. शेवटी, शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे, 1917 च्या कलकत्ता अधिवेशनात काँग्रेसने प्रथमच अस्पृश्यतेविरुद्ध ठराव मांडला. तेही कदाचित त्यामुळेच शक्य झाले असावे. अॅनी बेझंट त्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
1931 : अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन
विजेचा दिवा, ग्रामोफोनचा शोध लावून सामान्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारे अमेरिकनस संशोधक, उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा आज स्मृतीदिन. ए़डिसन यांचा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. एडिसन लहान असताना त्यांच्या शालेय वर्गातील शिक्षकांनी हा अतिशय “ढ” आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसन यांना शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्यांनी आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याचे काम केले.
विजेचा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा आदी विविध शोध लावून एडिसन यांनी जगावर अनेक उपकार केले. त्याच्या नावावर 1,093 पेटंट आहेत.
1950 : अभिनेता ओम पुरी यांचा जन्म
कसदार अभिनय, दमदार आवाजाच्या बळावर विविध भूमिका जिवंत करणारे अभिनेते ओम पुरी यांचा आज जन्मदिन. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना 1990 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अर्ध सत्य (1982) या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
ओम पुरी यांनी जवळपास 300 चित्रपटामध्ये काम केले. त्याशिवाय, श्याम बेनेगल यांच्या ‘भारत…एक खोज’ या मालिकेतही त्यांनी सम्राट अशोक, औरंगजेब अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या.
1951 : पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन.
हिराबाई पेडणेकर या पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार होत्या. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1886 रोजी सावंतवाडीमध्ये संगीत, नृत्याची जाण असणार्या घराण्यामध्ये झाला. त्यांचं निधन 18 ऑक्टोबर 1951 रोजी झालं. हिराबाईंनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘जयद्रथ विडंबन’ (1904) व ‘संगीत दामिनी’ (1912) या नाटकांचा विशेष गाजली होती.
1987 : कम्युनिस्ट कार्यकर्ते, अनुवादक वसंतराव तुळपुळे यांचे निधन
ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते, अनुवादक वसंतराव तुळपुळे यांचा आज स्मृतीदिन. 1936 च्या आसपास ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. त्यानंतर कामगार चळवळ, स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते. 1964 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात फारसा रस दाखवला नसल्याचे म्हटले जाते.
सक्रिय राजकारणात वसंतराव तुळपुळे नसले तरी त्यांनी अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे, पुस्तकांचे अनुवाद केले. महान अर्थशास्त्रज्ञ आणि साम्यावादी विचारांचा प्रणेता कार्ल मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाच्या तीन खंडांचा अनुवाद तुळपुळे यांनी केला. ‘भांडवला’च्या या तीन अनुवादित खंडांच्या एकत्रित पानांची संख्या साधारण अडीच हजार आहे. त्याशिवाय, त्यांनी मार्क्सचं ‘पॅरिस कम्यून’, ‘गोथा कार्यक्रमावरील टीका’, लेनिनचे ‘मार्क्सचे सिद्धांत’, ‘डावा कम्युनिझम: एक बालरोग’, ‘शासनसंस्था आणि क्रांती’, ‘मार्क्स आणि एंगल्सचे धर्मविषयक विचार’, मार्क्सचे ‘तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य’, आदी डाव्या विचारांच्या पुस्तकांचे अनुवाद केले. दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘पुराणकथा आणि वास्तवता’ ( Myth and Reality) पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला.
2004 : चंदन तस्कर वीरप्पन पोलीस चकमकीत ठार
कुस मुनिस्वामी वीरप्पन हा कर्नाटक व तमिळनाडूमध्ये वावरणारा दरोडेखोर होता. हस्तिदंत मिळवण्यासाठी तो हत्तींची शिकार करायचा. त्याशिवाय कर्नाटकमधील चंदनांच्या लाकडाची तस्करी वीरप्पन करायचा. कर्नाटक आणि तामिळनाडू पोलीस जवळपास दोन दशके त्याच्या मागावर होते. वीरप्पनने अनेक पोलिसांच्या हत्यादेखील केल्या. आपल्याला पकडण्यासाठी सामान्य नागरिकांच्या छळाचा बदला घेण्यासाठी हे हल्ले केल्याचे वीरप्पन सांगत असे. मात्र, त्यातून त्याला आपली दहशत कायम ठेवायची असे. सन 2000 मध्ये वीरप्पनने दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते राज कुमार यांचे अपहरण केले होते. जवळपास 100 हून अधिक दिवस राज कुमार ओलीस होते.
2004 मध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. रुग्णवाहिकेतून जात असलेला वीरप्पन हा सुरक्षा यंत्रणांसोबतच्या चकमकीत ठार झाला.
इतर महत्त्वाच्या घटना
1861: न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य यांचा जन्म
1922: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
1967: सोविएत रशियाचे व्हेनेरा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
2002: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
1977: भारतीय अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म.
[ad_2]