11th January In History Indian Prime Minister Lal Bahadur Shastri Death Anniversary Rahull Dravid Birthday Kailash Satyarthi Birthday

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

11th January In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात.  भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा आज स्मृतीदिन आहे. ताश्कंद करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचाही आज वाढदिवस आहे. 

1898 : ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते, असे समीक्षकांनी म्हटले आहे. कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.

1974 मध्ये त्यांना ‘ययाति’ कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

वि.स. खांडेकर यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या ‘उल्का’ या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला. खांडेकर यांनी आपल्या कारकीर्दीत 16 कादंबऱ्या, 6 नाटके, जवळपास 250 ललितलेख, 100 निबंधांचे लेखन केले आहे. 

1922 : मधुमेहाच्या रुग्णाला पहिल्यांदाच इन्सुलिन देण्यात आले

1921 मध्ये इन्सुलिनचा शोध लागला होता. कॅनेडियन सर्जन फ्रेडरिक बॅंटिंग आणि वैद्यकीय विद्यार्थी चार्ल्स बेस्ट यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन काढण्याचा मार्ग शोधला. त्याआधी अनेक वर्षे 1889 मध्ये ऑस्कर मिन्कोव्स्की आणि जोसेफ वॉन मेरिंग या दोन जर्मन शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, कुत्र्याच्या शरीरातून स्वादुपिंड काढून टाकल्यास त्यांना मधुमेह होतो. 1910 मध्ये शास्त्रज्ञांनी स्वादुपिंडातील पेशी ओळखल्या ज्या इन्सुलिन तयार करण्यासाठी फायदेशीर होत्या. ज्या लोकांना मधुमेह होता त्यांच्या स्वादुपिंडात रसायन तयार केले जात नाही. सर एडवर्ड अल्बर्ट शार्पे-शेफर यांनी हा शोध लावला. लॅटिन शब्द इन्सुलाच्या आधारे त्यांनी या रासायनिक इन्सुलिनचे नाव दिले. 

1921 मध्ये कॅनेडियन सर्जन फ्रेडरिक बॅंटिंग यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन वेगळे केले.  त्याच्या मदतीने तो मधुमेहाने त्रस्त असलेल्या दुसऱ्या कुत्र्याला 70 दिवस जिवंत ठेवू शकला. इन्सुलिन चमत्कार करू शकते हे या संशोधनातून समजले. यानंतर दोन संशोधक जे.बी. कॉलिप आणि जॉन मॅक्लिओड यांच्या मदतीने प्राण्यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन काढण्यात आले.11  जानेवारी 1922 रोजी लिओनार्ड थॉम्पसन नावाच्या 14 वर्षांच्या मुलाला पहिल्यांदा इन्सुलिनचे इंजेक्शन देण्यात आले.  

1954 : बालमजुरीविरुद्ध आवाज उठवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा जन्म

बालमजुरीविरुद्ध आवाज उठवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 1954 रोजी झाला. भारतातील बालहक्कांसाठी लढा देणारे कैलाश सत्यार्थी यांना 2014 चा नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. शांततेचा नोबेल पारितोषिक मिळविणारे कैलाश सत्यार्थी हे मदर तेरेसा (1979) नंतरचे दुसरे भारतीय आहेत.

कैलाश सत्यार्थी हे मुलांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते बालहक्कांसाठी वर्षानुवर्षे लढत आहेत. कैलाश सत्यार्थी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची नोकरी सोडून तीन दशकांहून अधिक काळ बाल हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल 80,000 बालकामगारांना मुक्त केले असून त्यांना जीवनात नवीन दिशा दिली. 

1955- मद्रासच्या पेरांबूरमध्ये रेल्वेचा पहिला कोच तयार  

मद्रासच्या पेरांबूर या ठिकाणच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये देशातील रेल्वेचा पहिला कोच निर्माण करण्यात आला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात अनेक अवजड उद्योग सुरु करण्यात आले. त्यामध्ये पेरांबूर या ठिकाणी रेल्वेचे कोच तयार करण्याचा कारखाना सुरु करण्यात आला होता. भारताच्या औद्योगिक विकासाची ही सुरुवात समजली जाते. आयसीएफ फॅक्टरी ही जगातील सर्वात मोठी रेल्वे कोच फॅक्टरी आहे. भारतीय रेल्वेच्या पाच रेक उत्पादन युनिटपैकी सर्वात जुने आहे. या फॅक्टरीमध्ये सध्या ते LHB कोच आणि सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन-सेटसह इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स तयार करते.

1966 : भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे निधन 

देशाचे दुसरे पंतप्रधान आणि ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 9 जून 1964 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. जवळपास 18 महिने ते देशाचे पंतप्रधान राहिले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करणारी हरीत क्रांती आणि दूधाचे विक्रमी उत्पादन वाढवणारी श्वेत क्रांतीदेखील लालबहादूर शास्त्री यांच्या काळात झाली. 

लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पाकिस्ताने भारतावर हल्ला केला होता. त्यानंतर भारताने 1965 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. 11 जानेवारी 1966 च्या रात्री ताश्कंदमध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्यासोबत ताश्कंद करारावर स्वाक्षरी केल्यानंतर रात्री झोपेत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान गावात झाला. 1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली. 

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1951 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 

1973 : क्रिकेटपटू खेळाडू द ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविडचा जन्म

भारतीय क्रिकेट संघाची भिंत ‘द वॉल’ अशी बिरुदावली असणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आज वाढदिवस. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 24,177 धावा केल्या आहेत.क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. वयाच्या 12 व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 15, 17 आणि 19 वर्षांखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. द्रविडने फेब्रुवारी 1991 मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 95 धावांची खेळी साकारली. त्या सामन्यात सौरव गांगुलीने आपल्या पदार्पणात कसोटी शतक झळकावले होते. कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी 10 हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेट खेळाडू आहे. तर, तो निवृत्त होईपर्यंत कसोटी खेळणाऱ्या सर्वच्या सर्व दहा देशांत शतके करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज होता.  कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण 164 सामन्यांत 210 झेल घेतले आहेत.

कसोटी सामन्यातील खेळाडू असा शिक्का राहुल द्रविडला मारण्यात आला होता. मात्र, त्याने एकदिवसीय सामन्यात आपली छाप सोडली. संघाच्या आवश्यकतेनुसार त्याने यष्टीरक्षणाचा भार स्वीकारला. त्यामुळे संघ अधिक संतुलित होऊ लागला होता. 2003 च्या क्रिकेट विश्वचषकात राहुल द्रविडने पूर्णवेळ यष्टिरक्षण केले होते. यष्टीमागे आणि खेळपट्टीवर फलंदाज म्हणून त्याने आपली छाप सोडली आहे. 

द वॉल, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडचा 2000 साली विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाकने सर्वोत्कृष्ट पाच फलंदाजांमध्ये उल्लेख केला होता. 2004 मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारोहात, दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला. 

क्रिकेटमधील योगदानासाठी राहुल द्रविडला भारत सरकारने पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

2008 : लेखक  य. दि. फडके यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण य दि म्हणून ओळखले जाणाऱ्या यशवंत दिनकर फडके यांचा 1931 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जन्म झाला. य.दि. फडके यांनी  राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. (1951) व एम. ए. (1953) ही पदवी त्यांनी मिळवली. 1973 साली ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष’ या प्रबंधासाठी मुंबई विद्यापाठाने त्यांना पीएच. डी. पदवी दिली. य. दि. फडके यांची स्वतंत्र व संपादित अशी एकूण 62 पुस्तके इंग्रजीत आहेत. त्यांचे बहुतांंशी लेखन विचावंतांच्या चरित्रांचा व कार्याचा तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचा वेध घेणारे आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्र (1901 ते 1947) हा त्यांनी लिहिलेला महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाच खंडातून प्रसिद्ध झालेला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

1787: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.
1966: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
1972: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
2008: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. 

 

[ad_2]

Related posts