vba prakash ambedkar taken back shankar chahande and decided to support vongress rebel kishore gajbhiye for ramtek lok sabha election marathi ( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर: रामटेक लोकसभेमध्ये वंचितने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रामटेक लोकसभेसाठी वंचितकडून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होती. मात्र काही तांत्रिक कारणांसाठी त्यांनी माघार घेतल्याचं वंचितने जाहीर केलंय. त्यामुळे रामटेकमध्ये आता महायुतीचे उमेदवार राजू पारवे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे आणि वंचितने पाठिंबा दिलेले किशोर गजभिये यांच्यात तिहेरी लढत रंगणार आहे.

किशोर गजभिये हे काँग्रेसमधून लोकसभेच्या तिकीटासाठी आग्रही होते. पण त्यांना संधी न देता काँग्रेसने रश्मी बर्वे यांना संधी दिली. परंतु रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या ठिकाणी डमी फॉर्म भरलेले त्यांचे पती, श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राला किशोर गजभिये यांनी आक्षेप घेतला होता आणि अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता. 

रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, रामटेकच्या काँग्रेसच्या अपात्र उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.जात वैधता पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता  प्रमाण पत्र रद्द केल्यानंतर नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केले. त्या नागपूर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष असताना शासनाकडून त्यांना मिळालेले मानधन आणि इतर भत्ता वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किशोर गजभिये म्हणाले होते की, “रामटेक लोकसभा मतदारसंघातून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. हा अर्ज वैध ठरला असून मला निवडणूक चिन्ह देखील प्राप्त झाले आहे. यामध्ये मला प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. मी माझ्या निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे त्याचा फटका कुणाला बसतो याच्याशी माझा काहीही संबंध नाही. त्याची मी चिंता देखील करत नाही. सध्याच्या घडीला मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही. मात्र लवकरच मी तोदेखील देणार आहे. मला उमेदवारी मागे घेण्याबाबत अनेकांचे फोन आले आणि माझ्यावर दबाव देखील टाकण्यात आला. मात्र सध्या घडीला मी त्यावर फार भाष्य करणार नाही.”

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

Related posts