पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :-pragatbharat.com कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३६वे वर्ष साजरे करीत असून, यंदा याचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल.
छत्रपती खा. शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, खा. मेधा कुलकर्णी , खा. सुनेत्रा पवार आणि खा. इम्रान प्रतापगढी हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ. बी. एन पाटील हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भव्य उद्घाटन सोहळा, हास्यकल्लोळ, ‘जाऊ देवाचिया गावा’ कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, नारदीय कीर्तन महोत्सव, मराठी कविसंमेलन, इंद्रधनु, उगवते तारे, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल, महिला नृत्य स्पर्धा, लावणी, मराठी-हिंदी गीते, पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शन याबरोबरच पूना गोल्फ कप टूर्नामेंट, बॉक्सिंग, द डर्ट ट्रॅक व मल्लखांब अशा क्रीडास्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये आहेत. यासोबतच ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी, ज्येष्ठ संगीतकार मदनमोहन, ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम मनाला हळवा करेल.
पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकमान्य सभागृह (केसरी वाडा) येथे संपन्न होतील. तसेच येरवडा गोल्फ क्लब, महाराष्ट्र मंडळ – टिळक मार्ग, वस्ताद लहूजी साळवे स्टेडीयम, भवानी पेठ व कोंढवा येथील म.न.पा मैदान येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.