Maharashtra ST Bus First Conductor Laxman Kevate Passed Away At Ahmednagar Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra ST Bus News:  राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे आज  (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये (ST Bus) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या एक जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा (ST Bus) साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या, गुरुवारी अहमदनगर येथील अमरधाम येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये  अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्या काळी नगर शहर फार लहान होते. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक असे नव्हतेच. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे धावली. त्यावेळी देखील खासगी अवैध प्रवासी वाहतूक होत असे. त्यांच्याकडून ही एसटीला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असे, जाणकार सांगतात. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले.

एसटीला 1 जून रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी सांगता पाहायला ते हवे होते. पण दुर्दैवाने ते मृत्यू पावले. त्यांच्या मृत्युने एसटी महामंडळाच्या परिवाराला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या निधनाने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असल्याची भावना महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली. 

पहिल्या प्रवासाच्या आठवणी 

एसटीचे पहिले चालक असलेल्या लक्ष्मण केवटे यांच्याबद्दल एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये आदराची भावना होती. लक्ष्मण केवटे हे आपल्या पहिल्या एसटी प्रवासाच्या आठवणी सांगायचे.  केवटे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, जून 1948 रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली होती. त्यावेळी प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोकांकडून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली जात असे. पुण्यातील शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस अहमदनगरमधील माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली होती. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असे केवटे यांनी एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. 

 

[ad_2]

Related posts