Weekly Recap Headlines 4 To 10 September Aditya L1 Mission G20 India VS Bharat Special Parliament Session

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तरपणे घेऊन आलोय…  

 शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखं 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणणार

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी  अफजल खानाचा वध केला ती वाघनखे 16 नोव्हेंबरला मुंबईत आणण्यात येणार आहे. शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार ब्रिटनशी करार करणार आहे. आणि त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य़मंत्री सुधीर मुनगंटीवार याच महिन्याच्या शेवटी लंडनला जाणार आहेत. दरम्यान, वाघनखे आणण्याची तारीख जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. (वाचा सविस्तर)

गो…गो…गोविंदा…कुठं 8 तर कुठं 9 थर; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह

गुरुवारी राज्यभरात दहीहंडी साजरी करण्यात आली. दहीहंडी हा पूर्णपणे मराठी माणसांचा सण आहे. राज्य सरकारने अलीकडेच या खेळाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. उंच टांगलेली दही हंडी मानवी मनोऱ्यांचे थरांवर थर रचून फोडणं हे या खेळातील प्रमुख आकर्षण असतं. गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी ही आता राज्याची एक प्रमुख सांस्कृतिक ओळख बनलीय. मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांपैकी एक असलेल्या जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यातील अनेक महत्वाच्या दहीहंडी मंडळांसाठी दहा थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केला. जय जवान गोविंदा पथकाचाच नऊ थरांचा विक्रम आहे.  यावर्षी दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या पथकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. हंडी फोडणाऱ्या गोविंदासाठी विमासंरक्षणाची तरतूदही करण्यात आलीय. तरीही हंडी फोडताना मानवी मनोरे कोसळून काही अपघातही होतात. त्यात काही गोविंदा जखमीही होतात. (वाचा सविस्तर)

मनोज जरांगे यांनी सरकारचा नव्या जीआरचा मसुदा धुडकावला; उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालन्यातील मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन सुरु केलंय. गेले काही दिवस शांततेत सुरु असलेलं हे आंदोलन पोलिसांच्या लाठीमारामुळे राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. या लाठीमाराचे पडसाद राज्यभरात उमटले. काही ठिकाणी हे पडसाद हिंसकही होते. त्याचा सर्वात मोठा फटका अर्थातच एसटीला बसला. तब्बल दोन तीन दिवस मराठवाड्यातील एसटी वाहतूक प्रभावित झाली. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मनोज जरंगे पाटलांची समजूत काढण्यात आली. त्यांच्या निर्देशानुसार एक जीआरही जारी करण्यात आला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची मागणी आहे. म्हणजे आधीपासून ओबीसींमध्ये असलेल्या कुणबी समाजासोबत त्यांनाही आरक्षण मिळेल. त्यासाठी निजामकालीन दस्तावेजांमध्ये मराठवाड्यातील मराठ्यांचा कुणबी अशीच नोंद असल्याचे दाखले दिले जात आहेत. अर्थातच याला ओबीसी जातीकडून विरोध होत आहे. (वाचा सविस्तर)

India Vs Bharat Controversy: देशाचं नाव बदलून भारत होणार का?

राष्ट्रपती भवनातून जी 20 शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रीतीभोजनाचं निमंत्रण बरंच चर्चेचं ठरलं. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या नावापुढे The President, India असा नेहमीचा उल्लेख टाळून The President, Bharat असा उल्लेख करण्यात आला. त्यावरुन एका नव्या चर्चेला सुरुवात झाली. संसदेचं आगामी विशेष अधिवेशन त्यासाठीच बोलावण्यात आलंय की काय याचीही शंका व्यक्त करण्यात आली. खरं तर घटनेच्या पहिल्या कलमातच India, That is Bharat असा स्पष्ट उल्लेख आहे.   त्यामुळे राष्ट्रपती महोदयाच्या निमंत्रणात भारत किंवा इंडिया असा कोणताही उल्लेख चुकीचा नव्हताच.. पण विरोधकांच्या इंडिया आघाडीचा संदर्भ देऊन मोदी सरकार घटनेतून इंडिया हा शब्दच वगळण्याच्या तयारीत आहे की काय याचीही चर्चा सुरु झाली. (वाचा सविस्तर)

जी-20 ला दिमाखात सुरुवात

जी 20 शिखर परिषदेचं यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. त्या शिखर परिषदेची जय्यत तयारी राजधानी दिल्लीत सुरु आहे. गेल्यावर्षी मुंबईसह पुणे, औरंगाबाद आणि नागपुरातही काही बैठका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यातली ही तीनही शहरे नव्या नवरीसारखी नटवली गेली होती. आता दिल्लीत राष्ट्राध्यक्षांची शिखर परिषद होत आहे. परिषदेच्या सुरवातीलाच रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी या बैठकीला येणार नसल्याचं स्पष्ट केलं. सुरवातीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याविषयीही साशंकता होती, पण त्यांनी भारतासाठीचा प्रवास सुरु केल्याचं वृत्त आहे. आज ते भारतात पोहोचतील. या परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना असलेल्या प्रश्नांचं सोपं उत्तर देण्यासाठी AI Geeta ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारीत यंत्रणा सज्ज करण्यात आलीय.  (वाचा सविस्तर)

देशाचं नाव बदलण्यासाठी किती पैसे होणार खर्च?

विरोधकांच्या आघाडीने इंडियाची आद्याक्षरे वापरुन सर्वसमावेशक आघाडी केल्यामुळे मोदी सरकार इंडिया शब्द हटवत असल्याची चर्चा झाली. त्यावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी भारत या नावाची आद्याक्षरे वापरुन विरोधकांच्या आघाडीचं नवं नामकरण करण्याचाही पर्याय सुचवला. देशाच्या घटनेतून इंडियाचा उल्लेख काढायचा असेल तर मोठा खर्च करावा लागणार आहे. कारण अनेक ठिकाणी भारतासोबत इंडिया हा शब्द वापरण्यात आला आहे. उदाहरणार्थ रिझर्व बँकेने जारी केलेल्या चलनी नोटा, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेले पासपोर्ट वगैरे.. त्यासर्वांचं नूतनीकरण करायचं तर कोट्यवधींचा खर्च लागेल, हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी हा खर्च टाळण्यासाठी विरोधक त्यांच्या आघाडीचं नाव बदलतील असं म्हटलंय. (वाचा सविस्तर)

 विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार? संभाव्य शक्यतांमध्ये दिवसेंदिवस भर

मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसदेत तर उर्वरीत चार दिवस नव्या संसदेत असतील. या संसद अधिवेशनाचं प्रयोजन कशासाठी हे सरकारने अजून जाहीर केलेलं नाही. मात्र दिल्लीतील सर्व अधिकाऱ्यांनी या काळात दिल्ली सोडू नये असंही बजावण्यात आलंय.  त्यावरुनच काँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हे अधिवेशन नेमकं कशासाठी आयोजित केलं जातंय, असा प्रश्न विचारुन काही मुद्दे ठरले नसतील चर्चेसाठी विषयही सुचवले होते. सरकारने अधिवेशनाचा अजेंडा जाहीर केलेला नसल्यामुळे, घटनेतून इंडिया हे नाव हटवणं, एक राष्ट्र एक निवडणूक, नव्या संसद भवनात कामकाज सुरु करणं, समान नागरी कायदा किंवा आता रोहिणी आयोगाचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडणं असे काही विषय चर्चिले जात आहेत. अधिवेशनाचा अजेंडा गोपनीय ठेवल्याने दररोज नवा विषय चर्चेला येत आहे. (वाचा सविस्तर)

आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण

चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर इस्रोने अपेक्षेप्रमाणेत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी शनिवार, 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल1 हे यान प्रक्षेपित केलं. या यानाच्या प्रक्षेपणानंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात आला. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान पाठवणाऱ्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताने आपलं नाव नोंदवलं आहे. 5 सप्टेंबर रोजी आदित्य एल 1 या यानाने पृथ्वीभोवती पहिली प्रदक्षिणाही पूर्ण केली आणि गुरुवारी एक सेल्फीही इस्रोला पाठवला. चांद्रयानाप्रमाणेच आदित्य एल वन मध्येही महाराष्ट्राचा खारीचा वाटा आहे. (वाचा सविस्तर)

[ad_2]

Related posts