37th National Games Table Tennis – Anannya Basak Swastika Ghosh Athletics – Bronze Aquatics | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची तेजस्वी कामगिरी, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, जलतरण,बिलियर्डस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पणजी :  महाराष्ट्राच्या क्रीडपटूनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, जलतरण, बिलियर्डस-स्नूकरमध्ये तेजस्वी कामगिरीची छाप पाडताना ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १० पदकांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत ४९  सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३४ कांस्यपदकांसह एकूण ११६ पदके मिळवत पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. हरयाणा दुसऱ्या आणि सेनादल तिसऱ्या स्थानावर आहे. 

ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. तेजस शिरसेने लागोपाठ दोन स्पर्धा विक्रम नोंदवत ११० मीटर्स अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या गोळाफेकीत आभा खातुआने सुवर्णवेध घेतला. सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले, तर ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राहुल कदमने कांस्य पदक जिंकले. आंतररराष्ट्रीय टेबल टेनिसपटू दिया चितळेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला संघाने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बिलियर्डस आणि स्नूकर क्रीडा प्रकारांमध्ये दोन रुपेरी पदके कमावली. महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने ओडिशाचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. महाराष्ट्राच्या महिला संघाचे तलवारबाजी क्रीडा प्रकारातील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. 

ॲथलेटिक्स –  तेजस शिरसेचे सोनेरी यश

महाराष्ट्राच्या तेजस शिरसेने लागोपाठ दोन स्पर्धा विक्रम नोंदवत ११० मीटर्स अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्समधील दुसरा दिवस गाजवला. महिलांच्या गोळाफेकीत महाराष्ट्राच्याच आभा खातुआने सुवर्णवेध घेतला. महाराष्ट्राची खेळाडू सेजल सिंग हिने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राहुल कदमने कांस्य पदक जिंकले. ॲथलेटिक्समध्ये सोमवारी महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. 

तेजसने सकाळी या शर्यतीमधील प्राथमिक फेरीत १३.८० सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवला होता. संध्याकाळच्या सत्रात त्याने १३.७१ सेकंद असा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. त्याने उत्कंठापूर्ण झालेल्या शर्यतीत ओडीशाचा जीवा ग्रेशनसन (१४.१३ सेकंद) व राजस्थानचा माधवेद्र सिंग (१४.१९ सेकंद) यांना पराभूत करीत विजेतेपद पटकावले. तेजस हा औरंगाबादचा खेळाडू असून त्याला सुरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यंदाच्या मोसमात त्याने अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे यश संपादन केले आहे. त्याने जूनमध्ये आयोजित करण्यात आलेला आंतरराज्य स्पर्धेतही या शर्यतीत सुवर्णपदक नोंदवले होते. यंदा मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत नोंदवलेली १३.६१ सेकंद ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे.

महाराष्ट्राची खेळाडू सेजल सिंगने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने ही शर्यत एक तास ४१ मिनिटे १३ सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीमध्ये उत्तर प्रदेशची ऑलिम्पिक  धावपटू प्रियांका गोस्वामीने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक जिंकले. तिने ही शर्यत एक तास ३६ मिनिटे ३५ सेकंदात पार करीत नवीन स्पर्धा विक्रम नोंदविला.‌ उत्तर प्रदेशची खेळाडू मुनिता प्रजापतीला कांस्य पदक मिळाले. हे अंतर पार करण्यास तिला एक तास ४२ मिनिटे २४ सेकंद वेळ लागला. महिलांच्या गोळा फेक स्पर्धेतील तिसऱ्या प्रयत्नात आभाने १७.०९ मीटर्सपर्यंत गोळा फेक करीत सोनेरी यश मिळवले. ती मूळची पश्चिम बंगालची खेळाडू असून मुंबईतील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागात नोकरी करीत असून ती मुंबईतच ॲथलेटिक्सचा सराव करते. तिने आतापर्यंत आशियाई मैदानी स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले असून अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राहुल कदमने कांस्य पदक जिंकताना ४७.१५ सेकंद वेळ नोंदवली. मुंबई येथे तो वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरी करीत आहे. तो राष्ट्रीय शिबिरातही प्रशिक्षण घेत आहे

टेबल टेनिस – महाराष्ट्राच्या महिला संघाला सुवर्ण

 आंतररराष्ट्रीय टेबल टेनिसपटू दिया चितळेच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या महिला संघाने सोमवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राने अंतिम सामन्यात हरयाणाला ३-१ अशी धूळ चारली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीने त्यांचा ३-२ असा निसटता पराभव केला. कॅम्पल इनडोअर स्टेडियम झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यातील पहिल्या रंगतदार लढतीत महाराष्ट्राच्या दियाने हरयाणाच्या प्रिथोकी चक्रवर्तीवर ३-२ अशी मात केली. दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषने सुहाना सैनीवर ३-० असा एकतर्फी विजय साकारला. तिसऱ्या लढतीत मात्र महाराष्ट्राच्या अनन्या बसाकने अंजली रोहिल्लाविरुद्ध १-३ अशी हार पत्करली. चौथ्या लढतीत दियाने सुहानाला ३-१ असे नामोहरम करून सामन्यासह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सांघिक गटातील पुरुषांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीकडून २-३ असा पराभव पत्करला. या सामन्यातील पहिल्या लढतीत दिल्लीच्या सुधांशू ग्रोव्हरने महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडेला ३-० असे हरवले. दुसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या समीर शेट्टीने यशांश मलिकवर ३-१ असा विजय मिळवून दिल्लीशी बरोबरी साधली. तिसऱ्या लढतीत दीपित पाटीलने आदर्श चेत्रीला ३-० असे हरवून महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पण चौथ्या लढतीत समीरचा सुधांशूविरुद्ध २-३ असा पराभव झाल्यामुळे दिल्लीला २-२ अशी बरोबरी साधायची संधी मिळाली. मग पाचव्या आणि निर्णायक लढतीत सिद्धेशने यशांशविरुद्ध १-३ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राने हा सामना गमावला.

बिलियर्डस आणि स्नूकर -दोन रुपेरी पदके 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बिलियर्डस आणि स्नूकर क्रीडा प्रकारांमध्ये दोन रुपेरी पदके कमावली. मापुसा येथील पेड्डम क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टवर चालू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या १००अप  बिलियर्डस गटात महाराष्ट्राच्या रोहन जाम्बुसारियाने कर्नाटकच्या भास्कर बालाचंद्राविरुद्ध १-३ अशी हार पत्करली. त्यानंतर पुरुषांच्या ६ रेड स्नूकर सांघिक गटात महाराष्ट्राच्या साद सय्यद आणि शिवम अरोरा जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मध्य प्रदेशच्या पीयूष कुशवाहा आणि रितिक जैन जोडीने साद आणि शिवम जोडीला ३-० असे हरवले. 

जलतरण -डायव्हिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला दोन पदकांची कमाई

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील जलतरण क्रीडा प्रकारात डायव्हिंग स्पर्धेमधील तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड प्रकारात महाराष्ट्राच्या ईशिका वाघमोडेने रौप्यपदक तर ऋतिका श्रीरामने कांस्यपदक जिंकले. ईशिका आणि ऋतिका यांनी अनुक्रमे १७२ व १६२ गुण नोंदवले. गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऋतिकाने सुवर्णपदक जिंकले होते तर ईशिकाने कांस्यपदक जिंकले होते. या दोघी सोलापूरच्या खेळाडू असून त्या दोघीही मध्य रेल्वेकडून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. 

हॉकी -महाराष्ट्राची विजयी सलामी

आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुष हॉकी संघाने ओडिशाचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली.
मापुसा येथील पेड्डेम क्रीडा संकुलात चालू असलेल्या हॉकी क्रीडा प्रकाराच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राकडून जुगराज सिंग आणि वेंकटेश केंचे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात ही कोंडी फुटली. सामन्याच्या २८व्या मिनिटाला महाराष्ट्राला पेनल्टी कॉर्नर मिळाला. युवराजच्या पासवर जुगराजने त्याचे गोलमध्ये रूपांतर करून महाराष्ट्राचे खाते उघडले. त्यामुळे मध्यंतराला महाराष्ट्राकडे १-० अशी आघाडी होती. तिसरे सत्र अतिशय रंगतदार ठरले. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला ओडिशाकडून अजय कुमार एक्काने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. परंतु ४४व्या मिनिटाला वेंकटेशने मैदानी गोल करून महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी महाराष्ट्राने मग अखेरच्या सत्रात टिकवून सामना जिंकला. 

 

[ad_2]

Related posts