What Is Kamaraj Plan Congress Senior Leader In Party Organisation Assembly Election Result Marathi Detail News abpp( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: तेलंगणा (Telangana) सोडलं तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh Election Result) आशा असताना आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) सत्ता असतानाही काँग्रेसला अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश सोडलं तर हिंदी बेल्टमधून काँग्रेस बाहेर पडलं. त्यामुळे लोकांमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या (Rahul Gandhi Bharat Jodo yatra) वेळी निर्माण झालेली सहानुभूती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हा तेवढ्यापुरताच होता का? की ही निर्माण झालेली सहानुभूती ज्येष्ठ नेत्यांच्या सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेसला (Congress) गमवावी लागली हे काही स्पष्ट होत नाही. अनेक पराभवांच्या अनुभवातून काँग्रेस काहीच शिकत नाही की काँग्रेसला त्याच्याच ‘कामराज प्लॅन’चा (Kamaraj Plan) विसर पडला हेदेखील समजत नाही. 

तेलंगणाच्या नेतृत्वाची कमान ही रेवंत रेड्डी (Revanth Reddy) या आक्रमक नेत्याकडे असल्याने त्यांनी बीआरएसला जशास तसं उत्तर दिलं आणि सत्ता खेचून आणली. त्या उलट राजस्थानमध्ये अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील राजकारण जनतेने पाहिलं. तसेच ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) काँग्रेस सोडून गेल्यानंतर कमलनाथ (Kamal Nath) यांच्याकडे नेतृत्व आलं खरं, पण मध्य प्रदेशच्या जनतेच्या मात्र ते पचनी पडलं नसल्याचं स्पष्ट झालं. 

साठच्या दशकामध्ये काँग्रेसची होणारी वाताहत थांबवण्याचं काम एका माणसाने केलं आणि तो म्हणजे के कामराज (K. Kamaraj). तामिळनाडूचे मुख्यमंत्री असलेल्या या व्यक्तीने त्यावेळी आपला राजीमाना दिला आणि पक्ष संघटनेमध्ये काम सुरू केलं. त्यांनी 1963 साली मांडलेल्या योजनेमुळे काँग्रेसची पडझड थांबली आणि काँग्रेस पुन्हा लोकप्रिय झाली. पुढे त्यांच्याच या योजनेला कामराज योजना म्हटलं गेलं. 

चीनच्या आक्रमणानंतर नेहरूंच्या लोकप्रियतेत घसरण सुरू

पंडित नेहरू हे पंतप्रधान असताना 1962 साली चीनने आक्रमण केलं आणि त्यानंतर झालेल्या युद्धात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर टीका होऊ लागली. त्याचदरम्यान देशातील नागरिकांवर कराचा बोजा वाढत होता, त्याचीही नाराजी होती. याचा परिणाम असा झाला की त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागली. 

पक्षाची होणारी ही वाताहत कशी थांबवायची याची चिंता नेहरूंना सतावत होती. त्यावेळी त्यांच्या मदतीला एक व्यक्ती धावून आला. के कामराज असं त्याचं नाव असून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. 

काय होता कामराज प्लॅन? (What Is Kamaraj Plan) 

पक्ष संघटना बळकट करायची असेल तर ज्येष्ठ नेत्यांना संघटनेत सक्रिय करावं लागेल असं कामराज यांनी नेहरूंना सांगितलं. पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला असून ते सामान्य लोकांपासून दूर झाले आहेत, परिणामी काँग्रेसपासून लोक दूर जात असल्याचं कामराजल यांनी नेहरूंना पटवून दिलं. त्यासाठी कामराज यांनी एक योजना मांडली. 

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदं सोडून द्यायची आणि पक्षसंघटनेत काम करायचं. त्या मंत्रिपदांवर तरूण नेत्यांची वर्णी लावायची अशी योजना के कामराज यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी स्वतः तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

सहा मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला

कामराज यांनी मांडलेली ही योजना नेहरूंना पटली आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, बिजू पटनायक, जगजीवन राम यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला. तसेच ज्या नेत्यांचे वय जास्त आहे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार देशातील सहा ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचे राजीनामे दिले. 

कामराज योजना यशस्वी (Congress Kamaraj Plan)

के कामराज यांनी मांडलेली ही योजना यशस्वी झाली. पक्षाचे ज्येष्ठ नेते संघटनेत पुन्हा सक्रिय झाल्याने पक्षाची वाताहत थांबली आणि जनतेत पुन्हा लोकप्रियता वाढीस लागली. पण कामराज यांच्या या योजनेमुळे मोरारजी देसाई यांच्यासारखे काही नेते नाराज झाले. आपल्याला मंत्रिपदावरून हटवण्यासाठी हा डाव रचला जात असल्याचं त्यांना वाटत होतं. 

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांमध्ये सत्तेचा मोह? 

भाजपची धुरा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे आल्यानंतर पक्षाने घोडदौड सुरू केली. ज्या कामराज योजनेचा खु्द्द काँग्रेसला विसर पडला होता ती योजना भाजपमध्ये छुप्या पद्धतीने राबवली गेली. पक्षाच्या नेत्यांनी वयाच्या 75 वर्षांनंतर कोणत्याही मंत्रिपदावर राहू नये असे आदेश देण्यात आले. त्यांच्या या निर्णयाने अनेक नेते नाराज झाले पण त्यामुळे पक्ष संघटना मात्र बळकट झाल्याचं दिसून येतंय.

दुसरीकडे काँग्रेसची मात्र पुन्हा वाताहत सुरू झाली. दोन लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुरेशा जागाही मिळाल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये सत्ता आली त्या राज्यांमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या हट्टापायी त्यांना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे त्या ठिकाणी एक तर सत्ता गेली किंवा तरूण नेते राजकारणाला वैतागून पक्ष सोडून गेल्याचं चित्र दिसतंय. 

ज्येष्ठ नेत्यांना लोकांनी नाकारले

ज्योतिरादित्य शिंदे यांना डावलून कमलनाथ यांच्याकडे नेतृत्व दिल्यानं त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. आता कमलनाथ हे मात्र जनतेचा विश्वास जिंकण्यास अपयशी ठरले. दुसरीकडे सचिन पायलट यांना डावलून अशोक गेहलोत यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं खरं, पण त्यातून काँग्रेसची सत्ता मात्र गेली. तुलनेने कमी वयाच्या रेवंत रेड्डी यांनी आक्रमकपणे प्रचार केला आणि तेलंगणात सत्ता आणली. 

एक काळ असा होता की राहुल गांधी यांच्या बाजूला अनेक तरूण नेते होते. राहुल ब्रिगेड असं या नेत्यांना म्हटलं जायचं. लोकही त्यांच्याकडे पक्षाचे भविष्य आणि आश्वासक चेहरा म्हणून मोठ्या आशेने पाहायचे. पण राज्यांमध्ये सत्ता आल्यानंतर त्यांना डावलून वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाच काँग्रेसने संधी दिली. या तरूण नेत्यांना काही करून दाखवण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसला त्याच्याच कामराज प्लॅनचा विसर पडला होता का असा प्रश्न पडतोय. ती योजना या आधीच पक्षात राबवली असती तर काँग्रेसची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नसती हे नक्की. 

ही बातमी वाचा: 

Related posts