Places To Eat In Lonavala Restaurants That Every Tourist Must Visit Mapro Garden Lonavala Maval Maratha 7 12 Lonavala Marathi Zatkaa Chicken Misal Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Unique Restaurants In Lonavala : मुंबई आणि पुण्यातील माणसांसाठी लोणावळा (Lonavala) म्हणजे हक्काचं पर्यटन ठिकाण. रोजच्या रुटिनचा अगदीच कंटाळा आला की लोक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात आणि सुट्टीचा आनंद घेतात. अगदी तास-दीड तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळ्याला भेट देण्यासाठी सुट्टीचा एक दिवस देखील पुरेसा असतो. दोन दिवसांची सुट्टी असेल आणि निवांत वेळ काढून लोणावळ्याला गेलात तर आणखीच धम्माल! 

आता लोणावळा म्हटलं की पहिला आठवतो तो हिरवागार निसर्ग, डोंगर-धबधबे, प्रचलित असे टायगर पॉईंट (Tiger Point) अन् लायन पॉईंट (Lion Point)… त्यानंतर रस्त्याला लागूनच असलेली मगनलाल चिक्कीची दुकानं (Maganlal Chikki Shops). पण त्याही पलीकडे जाऊन खवय्यांसाठी आता लोणावळा (Lonavala) खास ठरतंय.

चुलीवरच्या जेवणासह महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचा घ्या आनंद

तांबडा-पांढरा रस्सा अन् गावरान चिकन, मटणाची लज्जत अन् सोबत चुलीवरच्या भाकरींची चव… वाह! कल्पना करुनच कसलं भारी वाटतं. या जेवणाची अनोखी चव चाखायची म्हटलं तर आपल्याला पहिलं आपलं गावच आठवतं. पण आता अगदी काही अंतरावर असलेल्या लोणावळ्यात देखील आपल्याला अस्सल गावरान पदार्थांचा बेत अनुभवायला मिळतो. गावाकडचा अनुभव देणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंटची मांदियाळी सध्या लोणावळ्यात पाहायला मिळते. रसाळ स्ट्रॉबेरीच्या चवीसह मिनी महाबळेश्वरचा (Mini Mahabaleshwar) फील देखील आता लोणावळ्यात घेता येतो. तो कसा? तर अस्सल खवय्यांसाठी पाहूया लोणावळ्यातील काही खास ठिकाणं.

1. हॉटेल 7/12, कोल्हापुरी चवीचा उतारा (See on map)

आपल्यापैकी अनेकांनी हॉटेल 7/12 बद्दल याआधीही ऐकलं असेल. अस्सल कोल्हापुरी चवीच्या जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. याआधी कोल्हापूर आणि पुण्यात या हॉटेलच्या शाखा होत्या. परंतु आता लोणावळ्यात देखील आपल्याला अस्सल कोल्हापुरी चव चाखता येणार आहे. हॉटेल 7/12 (Hotel 7/12, Lonavala) मध्ये मिळणाऱ्या जेवणाला घरगुती गावरान जेवणाची चव आहे. घोंगडीवर बसून बैठ्या आसन पद्धतीत चिकन, मटणाच्या जेवणाची मज्जा घेण्याची गोष्टच काही और.

या हॉटेलची खास बात म्हणजे या हॉटेलची मांडणी. एंट्री करताच डाव्या बाजूला गाईचा गोठा, त्यापुढे विहीर अन् पुढे ग्रामपंचायत, गावातलं खुलं पटांगण, दिव्याचा कंदील कौलाला लटकवलेली घरं, मधोमध तुळशी वृंदावन आणि पुढे जिल्हा परिषद शाळा, असा काय तो थाट. अगदी गावचा आपलेसा अनुभव देणारं हे वातावरण आणि अशात समोरच वाढलेलं गरमागरम जेवणाचं ताट… हे सारं एकदा अनुभवण्यासारखंच आहे. 

खास पदार्थ

सात बारा स्पेशल चिकन थाळी : काळा चिकन, खरडा चिकन, तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, चुलीवरच्या भाकरी, इंद्रायणी भात, कांदा, लिंबू

स्पेशल कोल्हापुरी चिकन थाळी : लाल मसाला चिकन, खीमा, तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, चुलीवरच्या भाकरी, इंद्रायणी भात, कांदा, लिंबू

स्पेशल आळणी भात

2. हॉटेल मावळ मराठा (See on map)

लोणावळा शहराच्या अगदी मधोमध असलेलं, खवय्यांच्या मनात बसेल असं ठिकाण म्हणजे – हॉटेल मावळ मराठा (Hotel Maval Maratha). मुख्य रस्त्याला लागून असलेलं ढाबा स्टाईलमधील हे हॉटेल तेथील गावरान चवीच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. प्रवेशद्वारावरच महिला चुलीवर चपात्या आणि भाकरी बनवताना दिसतात. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीचं अस्सल गावरान जेवण येथे मिळतं. 

चिकन रस्स्याचा घमघमाट आणि हॉटेलच्या बाहेरच चुलीवर बनत असलेल्या गरमागरम भाकरी पाहून पर्यटकांची पावलं आपसुकच या हॉटेलकडे वळतात. चुलीवर बनलेली पिठलं-भाकरी आणि चिकन-मटणावर ताव मारायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. टेबल-खुर्चीसह पाटावरील बैठ्या आसन पद्धतीत तुम्ही लज्जतदार जेवणाचा आस्वाद येथे घेऊ शकता.

खास पदार्थ

गावरान चिकन थाली : गावरान सुकं चिकन, तांबडा-पांढरा रस्सा, चुलीवरच्या भाकरी, मिरचीचा ठेचा/खर्डा, इंद्रायणी भात, कोशिंबीर

मटण थाली : मटण रस्सा, सुकं मटण, तांबडा-पांढरा रस्सा, चुलीवरच्या भाकरी, मिरचीचा ठेचा/खर्डा, इंद्रायणी भात, कोशिंबीर

पिठलं-भाकरी


3. मेप्रो गार्डन (See on map)

महाबळेश्वरमधील मेप्रो गार्डनचा अनुभव आता लोणावळ्यात देखील घेता येतो, कारण याचीच एक शाखा लोणावळ्यात (Mapro Garden, Lonavala) देखील सुरू झाली आहे. जर तुम्हाला फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम, फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रिम चाखण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळ्यातील मेप्रो गार्डन एक उत्तम ठिकाण आहे. मेप्रो गार्डनमध्ये पिझ्झा, सँडविच देखील मिळतात, परंतु त्यात पैसे घालवणं म्हणजे वायफळ खर्च ठरेल. त्यामुळे फक्त स्ट्रॉबेरी क्रिमसोबत येथील वातावरणाची मज्जा घेतलेलीच बरी.

लहान मुलांना खेळण्यासाठी देखील मेप्रो गार्डन ही एक उत्तम जागा आहे. याशिवाय विविध मेप्रो प्रोडक्ट्स जसं की, मेप्रो सिरप, मेप्रो जॅम, चॉकलेट्स तुम्हाला येथून खरेदी करता येतात. या प्रोडक्ट्सचं फ्री टेस्टिंग देखील तुम्ही करू शकता. फोटो काढण्यासाठी अनेक आकर्षक कॉर्नर्स देखील मेप्रो गार्डनमध्ये बनवण्यात आले आहेत. या शिवाय एक कृत्रिम तळं देखील येथे पाहायला मिळतं.

खास पदार्थ

फ्रेश स्ट्रॉबेरी क्रिम

फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रिम

थिक शेक्स

ग्रील्ड सँडविच


4. मराठी झटका (चिकन मिसळ) (See on map)

मटकीची मिसळ तर तुम्ही खाल्लीच असेल. पण तुम्ही कधी चिकन मिसळचा आस्वाद घेतलाय का? ऐकूनच कुतूहल वाटत असेल ना? तर हो, लोणावळ्यात एक असं ठिकाण आहे, जिथे चिकन मिसळ खाण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. लोणावळ्यातील तुंगर्ली गावात असलेलं मराठी झटका हे हॉटेल (Hotel Marathi Zatkaa, Lonavala) तिथल्या मिसळसाठी प्रसिद्ध आहे.

आता तुमच्या मनात आलं असेल की, इथे साधी मटकीची मिसळ मिळत नाही का? तर त्याची चव देखील हॉटेल मराठी झटकामध्ये चाखता येते. पण या हॉटेलची चिकन मिसळ हे एक खास आकर्षण आहे. तसंच या ठिकाणी घरगुती पद्धतीचं जेवण देखील मिळतं. अगदी मोठमोठे कलाकार देखील या ठिकाणी येऊन त्यांच्या मिसळची अनोखी चव चाखून गेले आहेत. मिसळ खवय्यांनी एकदा या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.

खास पदार्थ

चिकन मिसळ

मराठी झटका स्पेशल चिकन थाळी : चिकन रस्सा, चिकन सुका, अंडा करी, चिकन खिमा, मिरची ठेचा, चपाती, भात

5. सितारा गार्डन रेस्टॉरंट (See on map)

मुंबईतून जे पर्यटक लोणावळ्याला जातात, त्यांनी नाश्त्यासाठी खंडाळा घाटातील सितारा गार्डन रेस्टॉरंटमध्ये (Sitara Garden Restaurant) नक्की थांबावं. येथील खाद्यपदार्थांपेक्षा गार्डन व्ह्यू असणारी आसन व्यवस्था आणि थंडगार वारा मनाला एक वेगळाच आनंद देतो. खंडाळा घाटाचं नयनरम्य दृश्य आणि समोरच हिरवेगार डोंगर असा सगळा आसमंत… त्यात या हॉटेलमध्ये मिळणारा गरमागरम चहा आणि वडापाव खाण्याचा आनंदच काही वेगळा आहे.

या ठिकाणी तुम्ही मसाला डोसा आणि मिसळ खाण्याचा अनुभव देखील घेऊ शकता. त्याच प्रमाणे, सर्व प्रकारचे जेवणाचे पदार्थ देखील येथे मिळतात. परंतु सकाळच्या वेळेत इथे असलेलं वातावरण हे सुखद असतं, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

खास पदार्थ

वडापाव

मिसळ

पोहे


हेही वाचा:

North Goa Vs South Goa : नॉर्थ गोवा की साऊथ गोवा? फिरण्यासाठी कोणतं ठिकाण ठरेल सर्वोत्तम? A टू Z माहिती

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

[ad_2]

Related posts