Crime Web Series Mostly Murder Accused Gets Idea For Killing From Web Series

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Web Series Crime:  गेल्या काही दिवसांमधे महाराष्ट्र आणि देशातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या हत्येच्या घटनांमधे एक समान सूत्र दिसून आलं आहे.  गुन्हे करण्यासाठीच्या कल्पना आरोपींना वेगवेगळ्या वेब सिरीज आणि क्राईम सिरियल्स पाहून सुचल्या.अनेक वेब सीरिजमध्ये हिंसक घटनांबरोबर  त्या घटनांमागची मानसिकता देखील सविस्तर पद्धतीने दाखवली जाते. गुन्ह्यांच्या या वाढत्या घटनांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बाबत नव्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मागील काही काळांमध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्येची प्रकरणे समोर आली आहेत. यातील आरोपीने केलेल्या हत्या आणि त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी केलेली धडपड या बाबी वेब सीरिजमधून सुचल्या असल्याची माहिती समोर आली.  

मागील काही काळात चर्चेत आलेली प्रकरणे 

–  श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफताबने हत्या करून मृतदेहाचे तुकडे घरातील फ्रीजमधे ठेवले होते. त्याचे एक एक तुकड्याची विल्हेवाट लावण्याचा आफताबचा प्रयत्न होता.

– बेंगळुरुमध्ये 23 वर्षांच्या आकांक्षाची तिचा लिव्ह इन पार्टनर अर्पितने गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह पंख्याला बांधून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. 

– पुण्यातील जॉन्सन लोबो या इंजिनियरची त्याची पत्नी, मुलगी आणि मुलीच्या प्रियकराने हत्या केली. दुसऱ्या दिवशी जॉन्सनचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून जॉन्सनच्या मोबाईलमध्ये कुटुंबाचे फोटो व्हॉट्स अॅपवर स्टेटस म्हणून पुढचे काही दिवस ठेवले.

–  मुंबईतील लालबागमध्ये मुलीने आईचा मृतदेह घरातच ठेवला होता. मुलीवर आईच्या हत्येचा आरोप आहे. 

–  दिल्लीत एका तरुणाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आणि फरार झाला. 

या घटनांसह आता समोर आलेली मीरा रोड मधील 56 वर्षांच्या व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा केलेला किळसवाण प्रकारही या यादीत जोडला गेला आहे. 

हत्येच्या या सर्व घटनांची कल्पना यातील आरोपींना कोणत्या ना कोणत्या वेब सिरीज पाहून सुचल्या असल्याचे तपासात समोर आले.  हत्या केल्यानंतर मृतदेहाची  विल्हेवाट कशी लावायची हे या आरोपींनी या वेब सीरिज पाहून ठरवल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालं. वेब सीरिज आणि क्राईम सिरियल्स पाहून असे गंभीर गुन्हे करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचं  पोलिसांनी म्हटले आहे.  

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणार्‍या कंटेंटवर कोणतही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या वेब सीरिजमध्ये गुन्ह्याचा नको इतका तपशील दिला जातो.  गुन्ह्याच्या घटनेबरोबरच गुन्हा करताना ती व्यक्ती करत असलेला विचार आणि त्यावेळची त्या व्यक्तीची मानसिकता दाखवण्यावर या वेब सीरिजमध्ये भर दिला जातो. याचा कळत-नकळतपणे बघणाऱ्यांच्या मनावर परिणाम होत असतो. 

खरं तर बहुतांश वेब सीरिज आणि क्राईम सिरियल्समधे गुन्हा करणारी व्यक्ती कितीही चलाख असली तरी सरतेशेवटी पोलीसांच्या हाताला लागतेच हे दाखवण्यात येतं. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस तो पोलिसांच्या तावडीत सापडतो हेच या क्राईम सिरियल्समधुन शिकण्याची गरज असते.  मात्र अनेकजण हे न शिकता त्यातून फक्त गुन्हे करण्याच्या वेगवेगळ्या आयडीया उचलतात.  

आज इंटरनेटने प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध होते. त्यामुळे वेब सिरीज पाहण्यासाठी वेळ आणि ठिकाण यांच बंधन उरलेलं नाही.  त्यामुळे कित्येकजण तासनतास वेब सीरिजच्या जाळ्यात अडकून पडतायत आणि त्यातील काही तर हत्येसारखे गंभीर गुन्हे करायला प्रवृत्त होतायत.  त्यामुळे वेब सिरीजच्या कंटेंटचे नियमन करण्याबरोबरच काय पहायचं आणि काय नाही पहायचं हे प्रत्येकाने ठरवून घेण्याची गरज आहे.

आजच्या जगावर इंटरनेटच्या सहाय्यने उभ्या राहिलेल्या आभासी जगाची काळी छाया पसरलीय. या छायेत वावरणारे वेब सीरिजमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना पाहून आपण ही असेच करु शकतो आणि तो गुन्हा पचवू शकतो या भ्रमात असतात. जेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटतो तेव्हा ते स्वतः अशाच एखाद्या वेब सीरिजचा कंटेंट बनलेले असतात.

[ad_2]

Related posts