NCP Leader Ajit Pawar Statement Sharad Pawar Death Threat On Twitter

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar ON Sharad Pawar Threat : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी दिल्यांनंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शरद पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. फेसबुकवर तो भाजपचा असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यामागे मास्टरमाईंड कोण आहे?, याचा तपास व्हायला हवा आणि सरकारने त्याच्यावर योग्य कारवाई करायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

‘पवारांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे अशी त्याची फेसबुकवर माहिती आहे. त्याला भाजपचा पाठिंबा आहे का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही बाहेर असल्याने संपर्क झाला नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याचा तपास करावा आणि सौरभ पिंपळकर याला कोणाचा पाठिंबा आहे का? याचाही तपास करावा. त्याचे कॉल रेकॉर्ड तपासावे आणि कारवाई करावी.  

‘बातम्या देताना खातरजमा करत चला’

सध्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरला औंरंगाबादच म्हणणार असं शरद पवार म्हणाले अशी चुकीची बातमी एका माध्यमाने दिली होती. त्यानंतर त्यांंनी ट्विटरवर दिलगिरीदेखील व्यक्त केली मात्र बातम्या देताना खातरजमा करत चला, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला आहे. 

शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचे’ असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस फाटा त्यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे. 

सुप्रिया सुळेंकडून कारवाईची मागणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा दाभोळकर होणार, असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवारांना काही झाल्यास त्या सगळ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार असणार, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

[ad_2]

Related posts