पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंता महिलेची तिच्या प्रियकराने ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली असावी या संशयातून अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रियकराने बंदुकीतून पाच गोळ्या झाडून ही हत्या केल्याचे मयत महिलेच्या शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले आहे. लखनौवरून थेट हिंजवडीत येऊन त्याने अशा प्रकारे आपल्या प्रेमाचा शेवट केला.
वंदना के. द्विवेदी (वय २६) असे हत्या झालेल्या अभियंता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिषभ निगम (रा. लखनौ) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना आणि आरोपी रिषभ हे दोघेही महाविद्यालयात असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. वंदनाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती नुकतीच हिंजवडी येथे एका कंपनीत आयटी अभियंता म्हणून रुजू झाली होती. कंपनीच्या जवळच एका पीजी हॉस्टेलमध्ये राहत होती. आरोपी रिषभ हा लखनौमध्ये ब्रोकरचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. पण वंदना अपेक्षित संवाद करत नसल्याचे आरोपी रिषभला वाटत होते. त्यातून ती अन्य कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू होते.
आरोपी रिषभने चार-पाच वर्षापूर्वीच एका मित्राकडून बंदूक घेऊन ठेवली होती. मनातील संशय वाढत असल्याने आरोपी रिषभ २५ जानेवारी रोजी लखनौवरून हिंजवडी येथे आला. त्याने याठिकाणी ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये रूम बूक केली. मयत वंदना २६ जानेवारी रोजी सायंकाळी हॉटेलमध्ये आरोपी रिषभ याला भेटली. भेटून ती पुन्हा आपल्या हॉस्टेलमध्ये परतली. आरोपी रिषभने दुसऱ्या दिवशी मयत वंदनाला पुन्हा बोलावून घेतले. दोघांनी एकत्र खरेदी केली. सोबत जेवणही केले. २७ जानेवारी रोजी दिवसभर दोघेही एकत्र होते. मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास दोघेही हॉटेलच्या रुममध्ये असताना आरोपी रिषभने बंदूक काढून मयत वंदनाला काही कळायच्या आत तिच्या डोक्यासह शरीरात पाच गोळ्या झाडल्या. मयत वंदना रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी रिषभ हा काही घडलेच नाही असे दाखवत रात्री दहाच्या सुमारास रुमचा दरवाजा बंद करून पसार झाला. तो मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी नाकेबंदीत त्याच्यावर संशय आल्याने बॅग तापसली. बॅगेत बंदूक आढळली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हिंजवडीतील हॉटेलच्या रुममध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी आरोपी रिषभ याला अटक केली आहे.