Sharad Pawar slams Ajit Pawar and PM Modi ED in Pune Event( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे काहीजण सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. तुम्ही जागृत राहा आणि कष्ट करा. महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील. जनतेची सहानुभूती आणि संमती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा सल्लाही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

यावेळी शरद पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) होणाऱ्या कारवाईविषयी भाष्य केले. आजघडीला देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जातो. यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणालाही माहिती नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. या काळात ईडीचा गैरवापर झाला. २०१४ ते २०२३ या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवण्यात आल्या. चौकशीनंतर त्यापैकी केवळ २५ प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. मात्र, या २५ पैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास ४०४ कोटी रुपये खर्च झाले, असे शरद पवार यांनी सांगितले. ईडी कोणाच्या मागे लागली, याकडेही बघितले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये १८ १४७ नेत्यांची चौकशी झाली. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. भाजप सत्तेत आल्यापासून ईडीचा हत्यारासारखा वापर होत आहे. भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, ईडीने कारवाई केलेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधानांनी गांधी-नेहरुंवर टीका करणे शहाणपणाचं लक्षण नाही: शरद पवार

भाजपकडून सत्तेचा वापर करताना देशात काही धोरणं राबवली जात आहेत. ही धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत. नुकतंच लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज संपले. पंतप्रधान मोदी यांचं राज्यसभेतील भाषण ऐकलं असेल. त्यांनी आपल्या भाषणात काय सांगितले? पंतप्रधानांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. ज्या कुटुंबातील व्यक्तींनी स्वातंत्र्य आंदोलनात १३ वर्षे तुरुंगात काढली. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. देशाला लोकशाही शासन दिले त्या लोकांवर व्यक्तिगत हल्ले करुन पंतप्रधान मोदी यांनी काय साधले?, असा सवाल शरद पवार यांनी विचारला. ज्या लोकांनी देशाला विचार दिला आणि दिशा दाखवली त्यांच्यावर टीका करणे आजच्या राज्यकर्त्यांची भूमिका आहे. हे शहाणपणाचे लक्षण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

अधिक पाहा..

Related posts