3rd July In History On This Day Mahatma Phule Open First School For Untouchable Cast Student Harbhajan Singh Birthday Actor Rajkumar Death Anniversary

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

3rd July In History: आजच्या दिवशी महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्याशिवाय, आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस आहे. प्लास्टिक प्रदूषण आणि त्याचे नैसर्गिक पर्यावरणावर होणारे घातक परिणाम याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिन 

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. प्लास्टिक प्रदूषण आणि त्याचे नैसर्गिक पर्यावरणावर होणारे घातक परिणाम याबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. प्लास्टिकच्या पिशवीचे विघटन होण्यासाठी 100 ते 500 वर्षे लागू शकतात.

आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिवस 2009 मध्ये पश्चिम युरोपने सुरू केला. प्लास्टिक पिशव्यांचा वापर दूर करण्याच्या उद्देशाने हा एक जागतिक उपक्रम आहे. प्लास्टिक आणि विल्हेवाट लावण्यासाठीच्या उपकरणांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

1852:  महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली

महात्मा फुले यांनी  1848 साली पुण्यात भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली होती. त्यानंतर बहुजन, अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी महात्मा फुले यांनी पुढेदेखील प्रयत्न सुरू ठेवले. 1852 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात चिपळूणकर वाड्यात शाळा सुरू केली. ही शाळा विशेषत: अस्पृश्य समाजातील मुलींसाठी होती. महात्मा फुले यांनी 1858 पर्यंत मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या होत्या. या तीन शाळांमध्ये 273 विद्यार्थीनी शिक्षण घेत असे.  1857 च्या बंडानंतर परदेशातून शाळेसाठी मिळणारा निधी बंद झाला. पुरेशा आर्थिक निधी अभावी महात्मा फुले यांना नाईलाजाने तिन्ही शाळा बंद कराव्या लागल्या. 

1926: साहित्यिक सुनीता देशपांडे यांचा जन्म

मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा आज जन्मदिन. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व असणारे पु.ल. देशपांडे यांच्या त्या पत्नी होत्या. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच ‘वंदेमातरम्’ या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. ‘राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या ‘सुदर मी होणार’ मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

जी.ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ’प्रिय जीए पुरस्कार’ 2008 मध्ये सुनीता देशपांडे यांना जाहीर झाला होता. सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ हे आत्मचरित्र चांगलेच गाजले. त्याशिवाय, त्यांनी इतर साहित्यप्रकारातही योगदान दिले. 

1980: माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचा जन्म

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचा आज जन्मदिन आहे. हरभजन सिंह यांने भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक विजयांमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. पहिला टी-20 विश्वचषक, 2011 मधील विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य आहे. 

2001 मध्ये भारताच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉचा संघ आला होता. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे खांद्याच्या दुखापतीने जायबंदी झाल्याने हरभजन सिंहला प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले. या कसोटी मालिकेत हरभजन सिंहने स्वप्नवत कामगिरी केली. त्याने मालिकेत 32 बळी घेतले. यामध्ये एका हॅट्ट्रिकचा समावेश आहे. हरभजन सिंह या मालिकेत मालिकावीर ठरला. हरभजन सिंहने 103 कसोटी सामन्यात 417 बळी घेतले. तर, 236 एकदिवसीय सामन्यात 269 बळी घेतले. 28 टी-20 सामन्यात त्याने 25 बळी घेतले. 

1996: अभिनेते राजकुमार यांचे निधन 

आपल्या खास संवादशैलीसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते राजकुमार यांचे निधन आजच्या दिवशी झाले. बलुचिस्तानमध्ये कुलभूषण पंडित यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीत काम करताना त्यांनी राजकुमार हे नाव निवडले. कुलभूषण पंडित यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. एकदा निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामाने पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना कुलभूषण यांच्या बोलण्याची शैली फारच आवडली. त्यांनी लगेचच त्यांच्या ‘शाहीबाजार’ या चित्रपटात काम करण्यासाठी कुलभूषण यांना विचारले. त्यानंतर त्यांनी पोलीस सेवेतून राजीनामा देऊन चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

सुरुवातीला, त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, त्यानंतर मेहबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून उदयास आले. ‘वक्‍त’ या चित्रपटातील त्यांचे संवाद चांगलेच गाजले. हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका साकारल्या. 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) आदी चित्रपटही हिट ठरले. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या सौदागर या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. दिलीपकुमार आणि राजकुमार या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी चित्रपटात दिसून आली. 

2020: नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन 

हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे आजच्या दिवशी निधन झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षी खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी पार्श्वभूमितील नर्तिका म्हणून काम केले. खान यांनी सन 1974 मध्ये त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून गीता मेरा नाम या चित्रपटासाठी काम केले होते.

खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे पाच दशके नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींना त्यांनी दिग्दर्शन केले. श्रीदेवीचे ‘‘हवा हवाई…‘’ आणि माधुरी दीक्षितचे ‘‘धक धक करने लगा…‘’ या गाण्यातील नृत्यांना खान यांचे दिग्दर्शन होते. ही गाणी आणि त्या गाण्यांतील नृत्ये आजही लोकप्रिय आहेत.

खान यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे 2000 हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षितच्या कलंक चित्रपटातील ‘‘तबाह हो गये…’‘ या गाण्याचे केलेले नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचे अखेरचे होते. 

इतर महत्त्वाच्या घटना 

1884: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
1886: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
1971: विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज  यांचा जन्मदिन 
1998: कवी प्रदीप – यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
2000 : विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी मान्यता दिली.

[ad_2]

Related posts