[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आजची सकाळच वाईट बातमी घेऊन आली. रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेले इर्शाळवाडी हे गाव संपूर्ण नष्ट झालं होतं. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या सर्वांना गुरुवारची सकाळ पाहताच आली नाही. मात्र हेच सगळं प्रत्येक चॅनलचे रिपोर्टर आणि कॅमेरामन टिपत होते. अर्थात बातमी वाचूनच अनेक लोक हळहळ व्यक्त करत होते. मात्र ही लोकं प्रत्येक वेळी स्पॉटवर जाऊन सगळे व्हिडीओ आणि घटना आपल्यापर्यंत पोहचवत असतात. त्यातच कॅमेरामॅनच्या व्हिडीओमुळे प्रत्येक ठिकाणाची दृष्य आपल्याला पाहायला मिळतात.

अशीच घटना 2014 मध्ये माळीण गावात घडली होती. आमचे सहकारी असलेले ‘एबीपी माझा’चे कॅमेरामन प्रत्येक क्षणाचे अपडेट आणि व्हिडीओ देत होते. सुमारे 150 लोक यावेळी मृत्यूमुखी पडलेले. अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. हे सगळं दृष्य आमचे सहकारी विजय राऊत टिपत होते. आज याच माळीणची पुनरावृत्ती झाली. सकाळीच इर्शाळवाडी गावात भुस्खलन झाल्याची बातमी आली आणि त्यांना 2014चा तो दिवस आठवला… दिवस होता 30 जुलै 2014….विजय राऊत यांनी माळीणच्या घटनेचे वृत्तांकन करताना आलेल्या सांगितलेले हा थरारक अनुभव…

कसा होता थरारक अनुभव?

सकाळी सात वाजताची बस ज्यावेळी माळीण गावात पोहचली त्यावेळी त्या बसच्या ड्रायव्हरला गावच दिसलं नाही. तेव्हा तो डोंगर माळीणवर कोसळला आणि माळीण गाव नेस्तनाबूत झाल्याचं कळलं. त्यानंतर ड्रायव्हरने ही माहिती संबंधितांना दिली आणि सकाळी माळीणमध्ये भुस्खलन झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहचली,असं विजय राऊत सांगतात.

त्या काळ्या दिवसाचं वर्णन करताना ते सांगतात की, ’दिवस होता 30 जुलै 2014… सकाळी फोन आला आणि तातडीने आम्ही माळीणकडे रवाना झालो. हाती कॅमेरा आणि पुढे किती किलोमीटरचा प्रवास असेल याची काहीही माहिती न घेता आम्ही माळीणमध्ये दाखल झालो होतो. त्यापूर्वीचा प्रवास प्रचंड थरारक होता. पावसाळ्याचे दिवस, सगळीकडे धुकं, डिंबे धरण पार केले. मात्र माळीणमध्ये नेमकं काय करायचं याचा अंदाज येत नव्हता. अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेलं आहे, एवढीच माहिती मिळाली होती. मी आणि सहकारी पत्रकार मंदार गोंजारी या दुर्घटनेत वाचलेली एकमेव तटस्थ उभी असलेल्या शाळेजवळ पोहचलो. त्यानंतर समोर पाहिलं तर सगळीकडे चिखल आणि त्यात दबलेलं माळीण गाव होतं.'

’हे सगळं टिपण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र सगळं पाहून अंगावर चर्रकन काटा आला. रडण्याचे हंबरडे, अनेकांचे ढिगाऱ्याखाली गेलेली संसार, आजूबाजुचा गोंधळ, सगळीकडे चिखल, वरुन मुसळधार पाऊस हे सगळं पाहून मी स्तब्ध झालो. यात नेमकं काय टिपायचं कळत नव्हतं. दोन मिनिटांसाठी सगळं शांत आणि थांबल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यातच सहकारी मंदार गोंजारींनी आवाज दिला. मात्र, तोही आवाज कानावर पडला नाही. त्यावेळी त्यांनी मला जोरात आवाज दिला आणि म्हणाले,” अरे विज्या … हे शुट कर….या ढिगाऱ्या खाली गाव होतं…” त्यानंतर मी भानावर आलो आणि हे सगळं विदारक दृष्य डोळ्यांच्या कडा ओल्या होत असताना टिपलं… हे सगळं भयंकर असल्याचं ते म्हणाले.

गुडघ्यापर्यंत पाय जेव्हा थेट चिखलात अडकला…

’हे सगळं घडत असताना मी सगळं टिपायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी सगळीकडे फक्त चिखल होतं. गाव कुठं आणि डोंगर कुठं याचा अंदाजही घेता येत नव्हता. हे सगळं टिपण्यासाठी मी थोडं अंतर चालत असताना माझे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत चिखलात गेले अन् दोन मिनिटांसाठी मला धस्स झालं. हातात कॅमेरा होता आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत चिखलात होते. त्यावेळी माळीण गावाच्या शेजारी राहत असलेल्या माणसाने मला पाहिलं आणि अक्षरश: त्याने दोन्ही हाताने उचलून मला दलदलीतून बाहेर काढलं…मात्र त्यात माझी चप्पल अडकली… मी चप्पल सोडली मात्र दिवसभर हे सगळं टिपायला आलेल्या मला पाहून त्या माणसाने चिखलात हात घालून माझी चप्पल काढली अन् चप्पल घाला नाहीतर पावसामुळे काम करणं शक्य होणार नाही, असं तो म्हणाला आणि त्यावेळी माणसातील माणूसपणाचा मला अनुभव आला’, असा प्रसंग त्यांनी सांगितला.

बचावकार्याचा अनुभवही विजय राऊत यांनी सांगितला ते म्हणाले की, माळीण गावात ज्यावेळी बचावकार्य सुरु झालं त्यावेळी सुरुवातीला जेसीबीच्या माध्यामातून घरावरची कौलं, बांबू बकेटमध्ये बाहेर येत होती. एवढी टुमदार असलेली घरं याच ढिगाऱ्या खाली दबलेली आहेत. याचा अंदाज आला आणि दुसऱ्या फेरीत जेसीबीच्या बकेटमध्ये थेट जनावरं दिसल्यावर धक्काच बसला. त्यानंतर एक एक मृतदेह विचित्र अवस्थेत बकेटमधून बाहेर काढल्या जात होते. माळीणकरांचं घरदार, संसार सगळंच उद्ध्वस्त झालं होतं.

सुट्टीला घरी आले अन् ढिगाऱ्याखाली गेले….

याच गावातील काही शाळकरी मुलं शेजारील आश्रम शाळेत शिकत होती. मात्र काही दिवसांच्या सुट्ट्या असल्याने ती सगळी शाळकरी मुलं गावात आली होती. त्याही मुलांचा यात जीव गेला. दुर्घटनेत वाचलेले त्यांचे पालक या सगळ्यांना शोधत होते. मात्र ही मुलं गेल्याचं पाहून आणि त्यांच्या पालकांना पाहून पुन्हा वाईट वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

अन् मायलेकं सुखरुप बचावले…

याचवेळी माळीण गावाच्या पलीकडच्या बाजूला आमची दुसरी टीम होती. मयुरेश कोण्णूर आणि अमोल गव्हाळे हे गावाच्या पलीकडच्या बाजूने रिपोर्टींग करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून एक लहान बाळ आणि त्याची आई बचावल्याची दिवसभरातील सगळ्यात आनंदाची बातमी मिळाली होती. त्यानंतर मी ज्या बाजूने शुट करत होतो. त्याही बाजूने काही लोकं जिवंत ढिगाऱ्याखालून बाहेर येईल, याची वाट बघत कॅमेरा लावून बसलो होतो मात्र मृतदेहाशिवाय त्या ढिगाऱ्यातून काहीही बाहेर आलं नाही, असा प्रसंग त्यांनी सांगितला.

याच ढिगाऱ्यात नव्याने सुरु होणाऱ्या संसाराच्या वस्तू आल्या. हे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात नव्या नवरीला लागणारी लाल रंगाची साडी, लग्नाची पत्रिका आणि संपूर्ण लग्नाचा बस्ता थेट पुढं आला आणि हेच सगळं दृष्य मी कॅमेऱ्यात टिपत होतो… तोपर्यंत संध्याकाळ झाली… कोणी जिवंत असल्याची आशा शमली आणि आम्ही सगळे व्हिडीओ घेऊन घोडेगावात परत आल्याची आठवण त्यांनी सांगितली.

त्यानंतर राज्याला माळीणचा तो काळा दिवस टीव्हीवर बघायला मिळाला…

ते म्हणाले की, घोडेगावात येऊन दिवसभर टिपलेले सगळे व्हिडीओ ऑफिसला पाठवले आणि त्यानंतर राज्याला हा काळा दिवस दिसला. ते दृष्य पाहून मी जसा हादरलो तसा महाराष्ट्र हादरला होता. हे सगळं अनुभवत असताना अनेकदा अंगावर काटा आला, हळहळ वाटली, डोळ्याच्या कडा पाणावल्या, कधी पाय चिखलात गेले तर अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानं वाईट वाटलं. मात्र काम… काम असतं या भावनेनं माळीणला आलेलो मी, कधी या लोकांच्या भावनेत अकडलो कळलं नाही आणि हे सगळं मी आणि माझा कॅमेरा अनुभवत होतो.

भर पावसात मृतदेह जळत होते…

दुसऱ्या दिवसाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, दुसऱ्या दिवशी पहाटेच पुन्हा माळीण टिपायला निघालो. मृतांची संख्या सतत वाढत होती. काही वेळानं पावसाच्या धारा थांबल्या पण मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रुंच्या धारा थांबतच नव्हत्या. त्याचवेळी गावाच्या बाहेर असलेल्या नदीजवळ एका रांगेत सगळे विचित्र अवस्थेत असलेले मृतदेह ओल्या सरणावर जळत होते. त्याचा काळा धूर सर्वत्र पसरला होता. त्यावेळी माझ्या डोळ्यातून आलेलं पाणी धुरामुळे येत होतं की तिथल्या सगळ्या हृदयद्रावक परिस्थितीमुळे येत होतं, याचा अंदाज येत नव्हता. मी आणि माझ्या कॅमेऱ्याने टिपलेलं दृष्य महाराष्ट्राने बघितलं होतं. आज सकाळी पुन्हा इर्शाळवाडीची बातमी आली तोच काळा आणि थरारक दिवस जशासतसा डोळ्यासमोर उभा राहिला.

[ad_2]