कन्नोज: अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने अनेक जणांची प्रकृती बिघडल्याच्याही बातम्या नेहमी येत असतात. अशी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यामध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे आढळून आले आले आहे. माहितीनुसार, कन्नोजमध्ये एका लग्न समारंभात रसगुल्ला खाल्ल्याने सुमारे ७० लोक आजारी पडले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर काहींना घरी सोडण्यात आले आहे. तर काही रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नौज जिल्ह्यातील सदर कोतवाली भागात एका लग्न समारंभात दिलेला रसगुल्ला खाल्ल्याने सुमारे ७० लोक आजारी पडले. एसडीएम गरिमा सिंह यांनी बुधवारी सांगितले की, सदर कोतवाली भागातील मधरपूर गावात मंगळवारी संध्याकाळी एका लग्नात वऱ्हाड्यांना जेवणात रसगुल्ला देण्यात आला होता. तो खाल्ल्यानंतर सुमारे ७० लोकांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले.
माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बाधितांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिथे अनेकांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडले. तर बाधितांमधील इरफान खान (४८), शाजिया (७), रियाजुद्दीन (५५), आरजू (१), अजरा (५), शिफा (४), यूसुफ (२) और सुल्तान (52) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधीक्षक (सीएमएस) शक्ती बसु यांनी सांगितले की, भरती करण्यात आलेल्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.
अन्नातून विषबाधा झाल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. याआधीही अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अन्नात केली जाणारी भेसळ याला कारणीभूत आहे. पैशाच्या हव्यासापोटी अन्नात अनेक आरोग्यास हानिकारक पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे सामान्यांना याचा फटका बसतो. सरकारनेही याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.