( प्रगत भारत । pragatbharat.com)
Symbolism Of Tortoise At Temples: मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिले दिसते ते कासव. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की देवळात देवाच्या पुढे कासव का असते? धार्मिक ग्रंथात किंवा पुराणात त्याचे काय महत्त्व आहे. याबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडलेत काय? अनेकांच्या देवघरातही देवाच्या पुढे कासव असते. पण याचे धार्मिक महत्त्व काय? हे आपण आज जाणून घेणार आहोत.
कासव हे मंदिरात असण्यामागे दोन कारणे सांगितले जातात. पहिले कारण अध्यात्मिक आहे. श्रीविष्णुच्या आशीर्वादामुळं प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते. कासव हा प्राणी सत्वगुणप्रधान असतो. त्यामुळं त्याला ज्ञानही प्राप्त होत असते. याच ज्ञानामुळं त्याला स्वतःची कुंडलिनी जागृत व्हा, अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णुची प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. म्हणूनच प्रत्येक मंदिरात देवाच्या पुढे कासव असते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दुसरे कारण म्हणजे, कासव हे शांततेचे व दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अवयव आत घेऊन बाह्य गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करते त्याप्रमाणेच मानवाने ही देवासमोर जाताना राग, क्रोध, मत्सर, लोभ विकार आवरुनच देवळात प्रवेश करावा व देवाचे दर्शन घ्यावे, असं सांगितले जाते.
कासव हे शांत असते ते दीर्घायुष्याचेही प्रतीक मानले जाते. तसंच, कासवाची नजर ही तीक्ष्ण असते. ते जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकते. कासवाचे हे गुण मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतात. योगशास्त्रात कूर्मासन हे मनःशांतीसाठी करण्याचा सल्ला दिला जातो.
हिंदू धर्मात व अध्यायात एक कथा सांगितली जाते, यानुसार श्रीविष्णुंनी घेतलेल्या दहा अवतारांमधील दुसरा अवतार हा कूर्मावतार होता. म्हणजेच जगाच्या कल्याणासाठी भगवान विष्णु यांनी कासवाचा अवतार धारण केला होता. देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला होता. तेव्हा भगवान विष्णुंनी समुद्रमंथनावेळी मंदार पर्वताचा भार स्वतःवर घेतला होता.
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये श्लोक
श्रीमद् भगवद्गीतेमध्ये एक श्लोकदेखील भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितला आहे. या श्लोकाचा अर्थही समजून घेणे महत्त्वाचे आहे.
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥
कासव ज्याप्रमाणे आपली इंद्रिये आतमध्ये ओढून बाह्यजगापासून अलिप्त होतात. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)