21st June Today In History On This Day RSS Founder Dr Hedgewar Death Anniversary Actor Arun Sarnaik Death Anniversary P. V. Narasimha Rao Become Prime Minister Of India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

21st June In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजही महत्त्वाच्या घडामोडी इतिहासात घडल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिन असून जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. तर, जागतिक संगीत दिनही आज आहे. 

आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारतासह जगभरात योगासनांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

जागतिक संगीत दिन

21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. या दिवशी, तरुण कलाकारांना पुढे येण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवसाला मेक म्युझिक डे म्हणून देखील ओळखले जाते. पहिला जागतिक संगीत दिवस 1982 मध्ये साजरा करण्यात आला. फ्रान्सचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जॅक लॅन्गे यांनी त्याचे आयोजन केले होते.

1940: RSS चे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन

केशव बळीराम हेडगेवार हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते. उच्च शिक्षण घेत असताना आणि त्यानंतरच्या काही वर्षापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. 

हिंदू धर्मीयांची संघटना असावी यासाठी त्यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना केली. नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. 1925 ते 1940 या दरम्यानच्या काळात त्यांनी सतत देशभर प्रवास करत संघाचा विस्तार केला. 1940 मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत निर्देश देऊन ठेवले होते. 

1953: पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा आज जन्मदिन. 
बेनझीर भुट्टो या पाकिस्तानातील आघाडीच्या राजकारणी आणि माजी पंतप्रधान होत्या. पाकिस्तान पीपल्स पार्टी या डाव्या-मध्यममार्गी पक्षाच्या अध्यक्ष होत्या. एखाद्या मुस्लिम देशाच्या सर्वोच्च नेतृत्वपदापर्यंत पोचलेली त्या पहिल्याच महिला होत्या. 1988-1990 आणि 1993-1996 या कालखंडांदरम्यान बेनझीर भुट्टो यांनी दोनदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो हे बेनझीर यांचे वडील होते.

1984: अभिनेते-गायक अरुण सरनाईक यांचे निधन 

1961 सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील एका भूमिकेतून अरुण सरनाईक यांनी चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले. अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. त्यामुळे गाण्याचे हे अंग अरुण सरनाईक यांना या जोडीकडूनच मिळालं होते. 21 जून 1984 रोजी एका दैनिकाच्या टॅक्सीतून ते पुण्याहून कोल्हापूरला जात होते. त्या टॅक्सीला कोल्हापूरजवळ अपघात होऊन अरुण सरनाईक यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 49 वर्ष होते. 

1991: नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली

पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव अर्थात पी. व्ही. नरसिंह राव यांनी आजच्या दिवशी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. 1991 ते 1996 या काळात त्यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली होती. या दरम्यानच्या काळात ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत भारतात नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात झाली. 

राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.

नरसिंह राव यांच्या काळात बाबरी मशीद पाडण्यात आली. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. 1962 साली केंद्रीय मंत्री झाले. ते 1971 पर्यंत केंद्रात मंत्री होते. 1971 ते 1973 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. 

इतर महत्त्वाच्या घटना:

1912 :  भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म

1948 : पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे आली. 

1958: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्म

1975: वेस्ट इंडीजने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

1998 : फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-5’ या संगणकाचा सहज पराभव केला.

2006 : नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.

2009: भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.

[ad_2]

Related posts