बाईकवरुन आलेल्या चोराने हिसकावले महिलेच्या कानातले; पकडताच कचाकचा चावून गिळले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Crime : गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या (Chain Snatching) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महिलांना हेरून त्यांच्या दागिने हिसाकवून बाईकस्वार पळ काढत असल्याचे अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे. मात्र दिल्लीत एक विचित्र प्रकार घडलाय. दिल्लीच्या (Delhi News) न्यू उस्मानपूर भागात एक महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने (Gold Earring) चोरून बाईकवरुन पळ काढण्याचा प्रयत्न एका चोराने केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. पीडित महिलेसह स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचे चोरी झालेले कानातले चोराकडे सापडलेच नाहीत.

न्यू उस्मानपूर परिसरात एका महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने बाईकवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावले होते. पीडित महिला तिच्या कुटुंबासह न्यू उस्मानपूरच्या ब्रह्मपुरी भागात राहते. 22 जून रोजी रात्री घडली 50 वर्षीय पीडित महिला एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कावरुन परतत होती. चालत ती महिला तिच्या घराजवळ पोहोचली. तेवढ्यात एक बाईकस्वार तिच्याजवळ आला. त्यावेळी महिलेने बाईकस्वाराला तू इथे का थांबला आहेस असे विचारले. तितक्यात बाईकस्वाराने महिलेचे दोन्ही कान पकडे आणि दागिने हिसकावून घेतले. महिलेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात चोरट्याने महिलेची पर्सही हिसकावून घेतली. 

पीडित महिलेसोबत त्यावेळी तिच्या दोन्ही सूना देखील होत्या. त्यांनीही आरडाओरडा करत चोरट्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या कानातून रक्त येत असतानाही तिने हिंमत दाखवत त्या चोरट्याला पकडून ठेवलं होतं. त्याचवेळी तिथे असलेल्या लोकांनीही चोरट्याला पकडं आणि बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. नासिर असे आरोपीचे नाव असून तो मुस्तफाबादचा रहिवासी आहे. त्याच्याकडून पीडितेची पर्सही जप्त करण्यात आली असून त्यात काही रुपये आणि महिलेचे आधार कार्ड होते. मात्र पोलिसांना महिलेच्या कानातील दागिने मिळाले नाहीत.

दागिने कुठे गेले?

“आम्ही त्याला धरुन ठेवले आणि त्याला पळून जाऊ दिले नाही. आम्ही त्याला त्याच्या बाईकवरून खाली पाडले. आजूबाजूच्या लोकांनाही ओरडून सगळा प्रकार सांगितला. आम्ही त्याच्याकडून कानातले परत घेण्याआधीच चोराने ते तोंडात घातले आणि चघळायला सुरुवात केली आणि मग त्याने ते गिळून टाकले,” अशी माहिती पीडित महिलेने दिली.

दागिन्यांचे काय झालं?

दरम्यना, पोलिसांनी घटनास्थळी पोहचून नासीरला अटक केली. ईशान्य दिल्लीचे उपपोलीस आयुक्त जॉय तिर्की यांनी सांगितले की, नासीरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. महिलेने सगळा प्रकार सांगितल्यानंतर नासिरला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याला डॉक्टरांनी अशी औषधे दिली आहेत, जेणेकरुन त्याच्या शरीरातून कानातले बाहेर पडतील. पीडित महिलेच्या कानाला दुखापत झाल्याने तिलाही रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले होते. सध्या पीडित महिलेची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related posts