पावसाच्या गारव्यात शरीराला ऊब देईल नाचणी खमंग भाकरी; पाहा सोपी, झटपट होणारी रेसिपी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ragi Roti Recipe : खिडकीबाहेर डोकावून पाहिलं असता पावसाच्या सरी दिसल्या की मन प्रसन्न होतं. पाऊस, छानशी गाणी, थंड वाऱ्याची झुळूक आणि एखादा वाफाळता पदार्थ, असा काहीसा माहोल सर्वांनाच हवाहवासा वाटतो. याच पावसाच्या दिवसांमध्ये झणझणीत पदार्थ आणि गरमगरम भाकरी असा बेत असेल तर, क्या बात! तुम्हीही असा एखादा बेत आखताय का? मग या गारव्याच्या दिवसांमध्ये शरीराला ऊब देणारी नाचणीची भाकरी नक्की खा. हो पण, या भाकरीला एक टविस्टही द्या. 

डब्यासाठी, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी, इतकंच काय तर न्याहारीसाठीसुद्धा तुम्ही ही भाकरी खाऊ शकता. बरं त्यासोबत काही नसेल तरीही तिची चव उत्तम लागणार यात शंकाच नाही. चला तर मग पाहुया नाचणीची खमंग भाकरी बनवण्याची पद्धत. 

साहित्य 

– तीन वाटी नाचणीचं पीठ 
– बारीक चिरलेला एक कांदा 
– किसलेलं एक गाजर 
– बारीक चिरलेली चार पाच कढीपत्त्याची पानं 
– धनेपूड, लाल मिरचीपूड, मीठ चवीनुसार 
– एक चमचा जिरे, तिळ 
– एक कप पाणी 

कृती 

– सर्वप्रथम नाचणीच्या पिठाच सर्व जिन्नस एकत्र करून एका रुंद भांड्यात हे मिश्रण एकजीव करून घ्या. 
– त्यानंतर पिठावर कोमट पाण्याचा शिडकावा करून पीठ मळून घ्या. 
– जेव्हापर्यंत पिठाचा गोळा व्यवस्थित तयार होत नाही तोवर ते मळत राहा. 
– आता एक सूता कापड घ्या आणि तो हलका ओला करा. 
– आता थालीपीठ थापतात तसंच ही भाकरी थापा आणि तिला गोल आकार द्या. 
– नाचणीचं पीठ लाटताना तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं ही भाकरी थापताना काळजी घ्या. 
– आता तवा चांगला गरम करून आच मध्यम करा आणि त्यावर ही भाकरी टाका. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. वरून चवीला तूप सोडत राहा. 
– भाकरी भाजली गेल्याचा सुगंध येताच ती तव्यातून काढा आणि घट्ट दह्यासोबत खा, खमंग भाकरी. दही नसल्यास तुम्ही लोणी, शेंगदाण्याची चटणी यासोबतही भाकरी खाऊ शकता. 

तेव्हा यंदाच्या पावसाळ्यात तेचतेच खाऊन कंटाळा आला असेल तर, ही नाचणीची खमंग भाकरी एकदा नक्की बनवून पाहा. 

Related posts