[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune News : हिमाचलच्या पुरामुळे सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून हिमाचल प्रदेशातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील काही पर्यटक तेथे सुट्टीसाठी गेले होते, ते आता पुरात अडकून पडले आहेत. एकूण 17 पर्यटक अडकले असून त्यापैकी 10 जणांशी संपर्क साधण्यात आला आहे, मात्र इतर 7 पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही. आता या पर्यटकांच्या कुटुंबीयांनी पुणे महानगरपालिकेकडे मदत मागितली आहे.
उत्तरेकडील राज्यात सध्या मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांमध्ये जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. 4 ते 9 जुलै दरम्यान चंदीगडहून हिमालयातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या 17 जणांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला कळवले होते मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचं कुटुंबियांनी सांगितलं होतं.
सोमवार (11 जुलै) आणि मंगळवारी (12 जुलै) यातील दहा जणांना बाहेर काढण्यात आले असून ते सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिली. उर्वरित सात जणांशी संपर्क नसल्यामुळे ही माहिती राज्य सरकारला देण्यात आली असून राज्य सरकार हिमाचल प्रदेशच्या स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
हिमाचलमध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे झालेल्या या विद्ध्वंसानंतर मदत आणि बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता…
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 31 वर गेली आहे. सोमवारपर्यंत (10 जुलै) मृतांची संख्या 18 वर होती. मात्र, पावसाच्या जोरामुळे ही संख्या आता 31 वर गेली आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कसोल, मणिकरण, खीर गंगा आणि पुलगा भागाचे हवाई सर्वेक्षण केले. त्यांनी सांगितले की, कुल्लूच्या सेंज भागात सुमारे 40 दुकाने आणि 30 घरे पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुल्लू येथील मदत शिबिरात लोकांशी संवाद साधला आणि त्यांना अन्न वाटप केले.
हेही वाचा-
[ad_2]