( प्रगत भारत । pragatbharat.com)
School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे.
या घटनेनंतर मुले रडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याचे पालक सांगतात. याप्रकरणी पालकांनी जिल्हा शाळा निरीक्षकांकडे तक्रारही केली आहे. शाळेच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचे पालक सांगत आहेत.
बीजीएस विजयनाथन शाळेच्या व्यवस्थापनाने फी न भरल्याच्या कारणावरुन मुलांना कोंडून ठेवले असा आरोप पालकांनी केलाय. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एका खोलीत एकत्र केले. यानंतर त्यांना बाहेरून दरवाजा लावून खोलीत कोंडण्यात आले, असे आरोपात म्हटले आहे.
सुमारे दोन ते तीन तास खोलीत कोंडून ठेवल्याने मुले अस्वस्थ झाली असे पालकांनी म्हटले. खोलीत कोंडलेली लहान मुले घाबरली आणि ओरडू लागली. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकूनही व्यवस्थापनाच्या हृदयाला घाम फुटला नाही, असेही ते म्हणाले.
अनेक तासांनंतर मुलांना बाहेर काढण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेतून आल्यानंतर मुलीने त्यांना याबाबत माहिती दिली. फी न भरल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापनाने दिला आहे, असे पालक श्यामेंद्र कुमार यांनी सांगितले. शाळेच्या कारवाईमुळे त्यांची मुलगी घाबरली असल्याचेही ते पुढे म्हणाले.
आम्हाला याबाबत माध्यमांकडून माहिती मिळाली आहे. तक्रारीच्या आधारे शाळा व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल,असे जिल्हा शाळा निरिक्षकांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणावर शाळा व्यवस्थापनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. फी न भरल्याने एकाही मुलाला खोलीत कोंडून ठेवलेले नाही. पालक खोटे आणि तथ्यहीन आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका मीनाक्षी यांनी दिली.