( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Video: आपल्या देशात वाहतुकीच्या नियमांना लोक फार गांभीर्याने घेत नाहीत. यामुळेच अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी, अपघात पाहायला मिळत असतात. वाहतूक पोलिसांसह राज्य सरकारही याबाबत वारंवार जनजागृती करत असतं. पण अद्यापही काहीजण जीव धोक्यात घालत असतात. दरम्यान, अशाच प्रकारे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणाऱ्या काही तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण प्रवास करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे. अन्यथा अशी घटना घडली आहे यावर कोणाचा विश्वासच बसला नसता.
ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूर येथे घडली असून व्हिडीओ ट्विटरला व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी तरुणांना अटक केली असून, त्यांना 22 हजारांचा दंड ठोठावला आहे.
चारचाकी चालकाने शूट केला व्हिडीओ
व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे हा चारचाकीचालकाने आपल्या गाडीतून हा व्हिडीओ शूट केला आहे. समोर जे चित्र दिसत होतं ते पाहून चालकाचा विश्वासच बसत नव्हता. दरम्यान व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, बाईकवर एकूण 7 जण बसले असून रस्त्यावरुन गाडी पळवत आहेत. यामधील दोघे टाकीवर बसले असून, चौघे सीटवर आहेत, तर एकजण खांद्यावर बसला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतरच त्यांनी किती धोका पत्करला आहे याची जाणीव होते. हा स्टंट करत ते फक्त स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत होते.
एक बाइक पर सात सवार,वायरल वीडियो हापुड़ की है!@hapurpolice pic.twitter.com/1xvMm1RgGO
— rajni singh (@imrajni_singh) August 9, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली. काहींनी तर त्यांना जेलमध्ये टाकून, आयुष्यभराचा धडा शिकवा अशी मागणी केली.
पोलिसांनी घेतली व्हायरल व्हिडीओची दखल
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करत व्हिडीओत दिसणाऱ्या सर्वांना अटक केली आहे. तसंच त्यांना 22 हजारांचा दंड ठोठावला आहे.
हापूर पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “हापूरच्या ग्रामीण भागात सात जण दुचाकीवर धोकादायक स्टंट करत होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर, हापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि दुचाकीस्वारांना 22 हजार रुपये दंड ठोठवला असून बाईक जप्त केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आणि नियमांच्या विरोधात असलेल्या गोष्टींमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले.