( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Video: आज भारत आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरम्यान भारताआधी पाकिस्तानने 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला. स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या नागरिकांनी दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीसमोर गर्दी केली होती. स्वातंत्र्यदिन असल्याने बुर्ज खलिफा इमारतीवर पाकिस्तानी ध्वज झळकेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण रात्री 12 वाजून गेल्यानंतरही पाकिस्तानी ध्वजाचे रंग झळकले नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या आशा फोल ठरल्या. यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केली. तसंच ‘पाकिस्तानी जिंदाबाद’ अशाही घोषणा दिल्या.
दुबईच्या बुर्ज खलिफा इमारतीसमोर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इमारतीसमोर हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं दिसत आहे. आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन असल्याने बुर्ज खलिफा इमारत देशाच्या ध्वजाचा रंग उधळतील असं त्यांना वाटत होतं. पण अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असणाऱ्या बुर्ज खलिफाने पाकिस्तानची दखलच घेतली नाही. यामुळे पाकिस्तानी नागरिक चिडले आणि आपल्या देशाच्या समर्थनार्थ घोषणा सुरु केल्या.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. यामधील एक व्हिडीओत पाकिस्तानी महिला बोलत आहे की, “रात्रीचे 12 वाजून 1 मिनिटं झाली असून, दुबईच्या अधिकाऱ्यांनी आता पाकिस्तानी ध्वज बुर्ज खलिफा इमारतीवर झळकणार नाही असं सांगितलं आहे. ही आता आपली औकात आहे”.
A Pakistani lady narrates, How Pakistan flag didn’t show up on Burj Khalifa on their Independence day pic.twitter.com/WNbEOetANL
— Gems of Politics (@GemsOf_Politics) August 14, 2023
पुढे ती सांगत आहे की, “सर्व पाकिस्तानी नागरिक घोषणा देत असल्याचं ऐकू येत आहे. पण यानंतरही बुर्ज खलिफावर पाकिस्तानी ध्वज दिसलेला नाही. सर्व पाकिस्तानींची त्यांनी खिल्ली उडवली हे किती दुखद आहे”.
व्हिडीओमध्ये पाकिस्तानी नागरिक नाराज झाल्याचं दिसत आहे. यानंतर ते आपापल्या घरी परतू लागले. यावेळी तिथे बराच गोंधळ उडाल्याचंही दिसत आहे.
पाकिस्तानने 14 ऑगस्टला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान अस्तित्वात आला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना 1947 साली ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. तर पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यावरुन बरेच वाद विवादही आहेत.
फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान अशी पाकिस्तानची निर्मिती झाली. तथापि, पाकिस्तान एकसंध राहू शकला नाही. 1971 मध्ये बांगलादेश नावाचे नवीन राष्ट्र बनले.