“पाकिस्तानी जनता चंद्रावर राहते! चंद्रावर गॅस, पाणी, वीज नाही इथंही नाही”; उडवली स्वत:चीच खिल्ली

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan 3 Mission Pakistani Reaction: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 23 ऑगस्टचा दिवस जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला. इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर टचडाऊन झालं आणि भारतासहीत जगभरामध्ये एकच जल्लोष झाला. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. एकंदरित चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला असून केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच ही कामगिरी करता आली आहे. आता या यादीत भारताचाही समावेश झाला असून जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनीही या मोहिमेच्या यशाची दखल घेतली आहे. मात्र सध्या पाकिस्तानमधील एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी जनता आपण आधीपासूनच चंद्रावर राहतोय असा दावा करत आहे. या दाव्यामागील तर्कही फार भन्नाट आहे.

नेमकं घडलं काय?

पाकिस्तानी जनतेला भारताच्या चंद्रमोहिमेबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य पाकिस्तानी लोकांची मतं एका कंटेट क्रिएटरने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान एका पाकिस्तानी तरुणाने पाकिस्तानमधील लोक आधीपासूनच चंद्रावर राहत असल्याचं विधान केलं आणि आपलं विधान कसं बरोबर आहे याचं स्पष्टीकरणही दिलं. भारताच्या चंद्रमोहिमेबद्दल काय मत आहे असं विचारल्यानंतर या पाकिस्तानी तरुणाने, “ते (भारत) पैसा खर्च करुन चंद्रावर जात आहे. आपण (पाकिस्तानी लोक) आधीपासूनच चंद्रावर राहतोय तुम्हाला ठाऊक नाही का?” असा प्रतिप्रश्न मुलाखत घेणाऱ्याला केला. हे विधान ऐकून मुलाखत घेणाऱ्याने आश्चर्यचकित होत थोडं हसतच, “म्हणजे कसं, आपण तर चंद्रावर राहत नाही,” असं म्हणत स्पष्टीकरण मागितलं. प्रतिक्रिया देणाऱ्या तरुणाने मुलाखतकाराला, “चंद्रावर पाणी आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावर मुलाखत घेणाऱ्याने, “नाही” असं उत्तर दिलं. हे ऐकताच त्या तरुणाने, “मग इथे (पाकिस्तानमध्ये) पण (पाणी) नाहीय” असं म्हटलं. त्यानंतर या तरुणाने, “तिथे (चंद्रावर) गॅस आहे?” असा प्रश्न विचारला. त्यावर समोरच्या व्यक्तीने “नाही” असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून तरुणाने, “मग इथेही (पाकिस्तानमध्ये) (गॅस) नाहीय,” असं म्हटलं. “तिथे (चंद्रावर) वीज आहे?” असंही या तरुणाने पुढे विचारलं. त्यावर मुलाखत घेणाऱ्याने, “नाही” असं उत्तर दिलं. यावर हा तरुण हसत, “इथेही नाहीय. इथेही पाहा वीज नाहीय,” असं म्हणत आजूबाजूच्या परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याचं दाखवलं.
 

पाकिस्तानी मंत्री आणि प्रसारमाध्यमांकडून दखल

पाकिस्तानचे माजी माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी चांद्रयान-3 च्य लँडरने यशस्वी टचडाऊन करण्याआधी प्रतिक्रिया दिली होती. “पाकिस्तानी माध्यमांनी चांद्रयान लँडिंगचं लाईव्ह दाखवलं पाहिजे. मानव जातीसाठी खास करुन शास्त्रज्ञांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे,” असं म्हटलं होतं. भारताची मोहिम यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही इस्त्रोचं कौतुक करणाऱ्या बातम्या केल्या.

Related posts