( प्रगत भारत । pragatbharat.com)
African Breeder Pata Seca: आजवर आपल्यासमोर जगातील अशा अनेक घटना आल्या आहेत ज्यांनी आपल्याला भांडावून सोडलं. एखाद्या देशातील युद्ध असो किंवा मग एखाद्या शासकाचे क्रूर नियम असो. हे असंही असतं? असेच प्रश्न आपल्याला अनेकदा पडले आहेत. अशाच एका वास्तवानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या होत्या, अनेकांनीच ही माहिती वारंवार वाचली. ही माहिती होती आफ्रिकेतील गुलामगिरीसंदर्भातील दुर्दैवी वास्तवाची.
आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांसाठी गुलामगिरीचा शाप त्यांना सातत्यानं प्रगतीपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरला. बऱ्याचदा आफ्रिकेतील नागरिकांना परदेशी नागरिक स्वत:च्या कामांसाठी गुलाम बनवत राहिले. यातच एक अशीही व्यक्ती होती, ज्याचा वापर फक्त मुलांना जन्म देण्यासाठीच केला गेला. या गुलामाचं नाव होतं पाटा सेका (Pata Seca). त्याच्यावर बळजबरी करत जवळपास 200 मुलांचा जन्म झाला होता.
मुलं जन्माला घालणारा गुलाम…
Breeding Slave Pata Seca चं खरं नावRoque Jose Florencio. 19 व्या शतकामध्ये ब्राझीलमधील एका धनाढ्य व्यक्तीनं त्याला गुलामीच्या चिखलाट लोटलं होतं. 7 फूट 2 इंच इतकी उंची असणाऱ्या पेटा साका सुदृढ होता. असं म्हणतात की तो 130 वर्षांचं आयुष्य जगला. पण, जीवनातील बराच काळ त्यानं अशा गुलामीत काढला जिथं मुलं जन्माला घालणं हेच त्याचं काम होतं.
शारीरिक सुदृढता पाहून मालकानं त्याला ‘ब्रीडर’ म्हणून कामावर रुजू केलं होतं. तो हतबल होता. दर दिवशी त्याला शेकडो महिलांशी शारीरिक संबंध ठेवावे लागत होते. त्याच्यापासून जन्मणारी मुलं शारीरिकदृष्ट्या सुदृढ अतील आणि त्यांच्याकडूनही भविष्यात मजुरीची कामं करून घेता येतील हा त्यामागचा हेतू होता. गुलामांची संख्या कमी होऊ नये या हेतूनं पाटा सेकावर हे अत्याचार होत राहिले. नियमित तपासण्या, चांगलंचुंगलं खाणं देऊन त्याला ब्रीडर म्हणून एखाद्या प्राण्याप्रमाणं वागवलं जात होतं.
पाटा सेकाची मुलं…
संपूर्ण जीवनकाळात पाटा सेकानं नेमके किती महिलांशी संबंध ठेवले याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार तो 200 हून अधिक मुलांचा बाप आहे. ही अशी मुलं आहेत ज्यांना आपल्या वडिलांकडूनच गुलामीचा वारसा मिळाला. काहींना स्वार्थापोटी विकण्यात आलं तर काहींना मालकांच्या शेतावर राबण्याचं काम करण्यासाठी हतबल करण्यात आलं.
पाटा सेकानं स्वातंत्र्य पाहिलं का?
1888 मध्ये अखेर ब्राझीलमध्ये गुलामगिरी संपुष्टात आली आणि पाटा सेका स्वतंत्र झाला. पुढील आयुष्यासाठी त्याला जमिनीचा एक तुकडाही देण्यात आला. पुढं त्यानं पामिरा नावाच्या एका मुलीशी लग्न केलं आणि मिळालेल्या जमिनीवर शेती करत उदरनिर्वाह केला. सूत्रांच्या माहितीनुसार 1958 मध्ये वयाच्या 130 व्या वर्षी सेकाचं निधन झालं. जेव्हाजेव्हा गुलामगिरीचे संदर्भ सांगितले जातात तेव्हातेव्हा जागतिक स्तरावर घडललेल्या घटनांमध्ये पाटा सेकाचंही नाव घेतलं जातं.