Pune RSS Meeting All India Coordination Meeting Of Rashtriya Swayamsevak Sangh In Pune For 3 Days From Tomorrow( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक 2023 उद्यापासून (RSS)  पुण्यात होत आहे. या बैठकीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे. 14 , 15, 16 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. 

संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात संघाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत. बैठकीत सहभागी होणार्‍या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते, असं आंबेकर म्हणाले. 

सामूहिक कामावर बैठकीत चर्चा होणार…

या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य आणि त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. अशाप्रकारच्या सामूहिक कामावरही बैठकीमध्ये चर्चा होते, अशी माहिती आंबेकर यांनी दिली. 

समाजासमोर जी आव्हाने येतात त्यांचा विचार करून कार्याची दिशानिश्चित केली जाते आणि हे कार्य राष्ट्रीय भावनेतून केले जाते,  ज्यातून कामाचा वेग वाढेल. जवळपास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या साऱ्या संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असून त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील. तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभव देखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असेही  आंबेकर म्हणाले. 

कोण कोण उपस्थित असणार?

संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे,  तसेच डॉ. कृष्णगोपाल डॉ. मनमोहन वैद्य,अरुण कुमार, मुकुंद आणि  रामदत्त चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,  सक्षम,  वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Related posts