[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj ) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा इतिहासकार इंद्रजीत देसाई यांनी केला आहे. दरम्यान शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करु नये असा सल्ला देखील इंद्रजीत सावंत यांनी यावेळी शासनाला दिला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवार (1 ऑक्टोबर) रोजी लंडनला रवाना होतील. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये शिवरायांची ही वाघनख ठेवण्यात आली आहेत. तर याच वस्तू संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबर रोजी करार करण्यात येईल. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. पण ही शिवरायांची वाघनखं नाहीतच असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता इतिहासकारांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ती’ वाघनखं शिवरायांची नाहीत
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ती वाघनखं शिवरायांची नाहीत, असा दावा केला आहे. सावंत यांनी म्हटल्यानुसार, ‘शिवरायांनी अफजलखानाचा वध करताना जे शस्त्र वापरलं ते कुठे आहे याची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण हे शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होतं. त्याविषयीच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत. पण आता जी वाघनखं आणली जात आहेत, ती शिवरायांनी अफजलखान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत. जर 1919 पर्यंत ही वाघनखं साताऱ्यात होती, अशा नोंदी आहेत. तर मग 1919 च्या आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामध्ये जमा झालेलं वाघनख हे शिवरायांचं असू शकत नाही.’
मग ‘ती’ वाघनखं कोणाची?
जी वाघनखं महाराष्ट्र शासन व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयामधून आणणा आहेत, त्याविषयी देखील इंद्रजीत सावंत यांनी संदर्भ दिले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘ही वाघनखं व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयात 1919 च्या आधीपासून आहेत. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सन 1818 मध्ये सातारच्या गादीवर प्रतापसिंह महाराजांना बसवलं. त्या महाराजांनी जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ नावाच्या इतिहासकाराला ही वाघनखं भेट म्हणून दिली होती. कनिंगहॅम याने मराठ्यांच्या इतिहासाबाद्दल लिखाण केलं आहे आणि त्यावेळी तो साताऱ्याचा रेसिडेंट देखील होता. तसेच प्रतापसिंह महाराज आणि त्याची चांगली मैत्री देखील होती. ती वाघनखं व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयात ग्रँट डफ यांच्या नातवाने भेट दिली. त्याबाबतच्या स्पष्ट नोंदी देखील या वस्तूसंग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये आहेत. त्यामुळे ती वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत, असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही.’
‘शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करु नये’
दरम्यान शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करु नये असं देखील इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आम्ही परत आणत आहोत, ही जी काही कथा रचली जातेय ते साफ खोटं आहे. इतिहासशास्त्राच्या पुराव्याच्या कसोटीवर हे टिकत नाहीये. जे काही खरं आहे ते शासनाने सांगावं. सुरुवातीला शासनाने सांगितलं की, आम्ही वाघनखं आणत आहोत. पण जेव्हा आमच्यासारख्या इतिहासकारांनी सांगितलं की, वाघनख कायमस्वरुपी येणार नाहीत, त्यावेळी शासनाने म्हटलं की आम्ही फक्त तीन वर्षांसाठी आणत आहोत. त्यामुळे शासनाने शिवप्रेमींची दिशाभूल करणं थांबवावं. ‘
हेही वाचा :
अफजलखानाचा कोथळा काढलेली शिवरायांची वाघनखे ‘या’ तारखेपासून कोल्हापूर, साताऱ्यात ‘याची देही याची डोळा’ पाहता येणार!
[ad_2]