Sharad Pawar : शरद पवारांची जुन्नरची भेट अन् अजित पवार गटाच्या अतुल बेनकेंची हवा टाईट, पवार जुन्नरच्या नव्या उमेदवाराच्या शोधात?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे: राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजप-सेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्ष संघटनेच्या स्तरावर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या गटातून कुणाला उमेदवारी देता येईल याची चाचपणीही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी आज जुन्नरमधील (Pune Junnar) काँग्रेस नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांची भेट घेतली. या माध्यमातून पवारांनी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनाही योग्य तो संदेश दिल्याची चर्चा आहे. 

अतुल बेनके शरद पवारांच्या स्वागताला, पण… 

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जुन्नरमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताला अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. त्यांना घेऊनच शरद पवारांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि काँग्रेस नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांची भेट घेतली. सत्यशील शेरकर यांच्या घरी शरद पवार आणि अतुल बेनके यांनी जेवणही केलं. त्यानंतर अतुल बेनकेंच्या घरीही पवारांनी भेट दिली. अतुल बेनकेंचे वडील वल्लभशेठ बेनके यांच्या तब्येतीची पवारांनी विचारपूस केली. 

पवारांनी ज्यांच्या घरी जेवण केलं ते सत्यशील शेरकर कोण? (Who Is Satyashil Sherkar)

सत्यशील शेरकर हे काँग्रेसचे दिवंगत नेते सोपानशेठ शेरकर यांचे सुपुत्र आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून ते शेतकरी आणि युवकांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. जुन्नर तालुक्यातल्या युवा वर्गात त्यांची चांगली क्रेझ आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळं शरद पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अतुल बेनकेंना पवारांचा योग्य तो संदेश (Atul Benke Supported Ajit Pawar) 

जुन्नर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा. या ठिकाणी आमदार अतुल बेनके हे निवडून आले आहेत. पण अजित पवारांनी वेगळा सुभा मांडल्यानंतर अतुल बेनके त्यांच्यासोबत गेले. आपण कुणाच्याही गटात नाही, आपली निष्ठा फक्त पवार कुटुंबीयांसोबत आहे असं जरी अतुल बेनके म्हणत असले तरी त्यांची अजित पवारांशी जवळीकता सर्वश्रूत आहे. त्यामुळेच शरद पवार या ठिकाणी नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. 

आपल्यासोबत आला नाहीत तर या ठिकाणी आम्ही नवीन उमेदवार देऊ शकतो असा संदेश आज पवारांनी अतुल बेनके यांना दिला असल्याची राजकीय चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवारांनी आज सत्यशील शेरकर यांच्या घरी भेट दिली. कदाचित त्याचाच धसका घेऊन आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या दौऱ्यात आपली उपस्थिती लावली की काय अशीही चर्चा आहे. त्यामुळे अतुल बेनके यांनी जर पवारांना साथ दिली नाही तर येत्या निवडणुकीसाठी शरद पवार आपला उमेदवार देऊ शकतात हे नक्की. 

राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? घड्याळ चिन्ह कुणाचं? पक्षाचा अध्यक्ष कोण? यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष सुरु आहे. येत्या 6 तारखेला निवडणूक आयोगात त्यावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके चक्क शरद पवारांच्या गाडीत दिसल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts