[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nashik Crime News: नाशिकच्या (Nashik News) नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) विहाहितेचा अपघाताचा बनाव रचत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये आणले नाही, या कारणावरून मंडळींनी डॉक्टर बहिणीचा दगडाने ठेचून खून केल्याची तक्रार मृताच्या भावाने केल्याने नांदगाव पोलिसात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथीलच वडिलांच्या त्रासाला कंटाळून आई आणि मुलाने मिळून खून केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉ. भाग्यश्री शेवाळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. गेल्या 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजेदरम्यान मन्याड फाटा परिसरात दुचाकी अपघातात न्यायडोंगरी येथील डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचा मृत्यू झाल्याची नोंद चाळीसगाव पोलिसात करण्यात आली होती. घटनास्थळ नांदगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने सदरचा गुन्हा नांदगाव पोलिसात वर्ग करण्यात आला होता..
दरम्यान या घटनेच्या 15 दिवसांनंतर मृत डॉ. भाग्यश्री यांचा छत्रपती संभाजीनगर येथील भाऊ सचिन कैलास साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार बहीण भाग्यश्रीकडे तिचे पती डॉ. किशोर शेवाळे व सासरे नंदू शेवाळे हे माहेरून घर व दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत होते. भाग्यश्रीकडून मागणी पूर्ण न झाल्याने डॉ. किशोर शेवाळे आणि नंदू शेवाळे यांनी भाग्यश्री यांचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ad_2]