UPI Service Launched By Ajit Pawar In Pune District Central Cooperative Bank

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला आमदार अशोक पवार, संजय जगताप, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते.

बँकेच्या शाखा वाढवून व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, युपीआयसारख्या सुविधेचा वापर करून बँकेने आपण काळासोबत असल्याचे दाखवून दिले आहे. या सेवेमुळे ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळू शकतील आणि बँकेत होणारी गर्दी कमी होईल.  बँकींग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशावेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे. बँकेने ग्राहक हित समोर ठेवून वाटचाल करावी. मोबाईल बँकीगमुळे या क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात यावे. बँकेच्या शाखा वाढवून व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा. बँकेच्या विकासविषयक बाबी मार्गी लावण्यासाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

विमा संरक्षण वाढविण्याबाबत संचालक मंडळाने विचार करावा

पगारदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळेल असे सांगून हे विमा संरक्षण 30 लाखाहून 50 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत संचालक मंडळाने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. बँक कर्मचाऱ्यांनी कुटुंब आणि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि ग्राहकांचे हीत जपण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. बारामतीच्या नागरिकांमुळे बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता आला, बँकेमुळे सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे बँकेशी निगडीत घटकांचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात त्यांनी बँकेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सुरुवातीला बँकेचे अध्यक्ष यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागरी सहकारी बँकांमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. बँकेच्या यूपीआय सेवेमुळे खातेदारांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यवहार करता येईल. अपघात विमा योजनेचा बँकेच्या सुमारे 26 हजार पगारदार खातेदारांना लाभ होणार असून त्यापोटी बँकेला 1 कोटी 55 लाख रुपये खर्च येणार आहे,  असे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Related posts