Citizens Attacked A Police Team That Went To Find The Robbers On A Remote Pada In Buldhana

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Buldhana News: मंगळवारी रात्री (30 मे) बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडेखोरांनी शेतातील एका घरावर दरोडा टाकला आणि चार जणांना जखमी करत ऐवज लुटून नेला. त्यानंतर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक विवेक पाटील आणि दोन कर्मचारी शरद गिरी, त्याचबरोबर युवराज राठोड यांना सोबत घेऊन बोरी अडगाव येथून बारा किलोमीटर आत असलेल्या अतिशय दुर्गम अशा फत्तेपूर पाडा गाठला. पारधी वस्ती असलेल्या या गावच्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन करण्याचं ठरवलं. 

याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पोलिस उप अधीक्षक विवेक पाटील यांच्यासह दोन कर्मचारी गेले असता या वस्तीवरील नागरिकांनी चौघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चौघांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी, या पथकातील तिघे जण वस्तीपासून दूर अंधारात पळून गेले. मात्र, पथकातील स्थानिक गुन्हे शाखेच्या शरद गिरी या कर्मचाऱ्यास वस्तीतील लोकांनी जबर मारहाण करत रात्रभर डांबून ठेवलं.

हे गाव ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं त्या हिवरखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गजानन वाघ यांनी आपल्या पथकाला नेऊन डांबून ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सकाळी सुटका केली. मात्र, या प्रकरणी अद्याप कुठेही पोलिसांनी नोंद घेतली किंवा गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असता सुरुवातीला घटना घडली नसल्याचं सांगितलं, मात्र नंतर थोडी बाचाबाची झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी दिली आहे.

दरोडेखोरांचा शोध अजूनही लागला नाही, मात्र कॉम्बिंग ऑपरेशन करताना पोलीस पथकावरच जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना झाली असताना अशा दुर्गम भागात पुरेसा बंदोबस्त सोबत न घेता नवख्या पोलिस उप अधीक्षकांना सोबत घेऊन बेजबाबदारपणाने जीवघेण्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्यावर आता पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

Mumbai: आईच्या अस्थींचं विसर्जन केलं आणि अबू सालेमच्या शूटरना बेड्या ठोकल्या, वंचितच्या प्रदेशाध्यक्षावर हल्ला करणाऱ्यांवर संजय कदम यांची धडक कारवाई

[ad_2]

Related posts