[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळाला (Sasoon Hospital Drug Racket) की त्याला पळवून लावण्यात आलं हा प्रश्न पहिल्या दिवसापासून विचारला जात होता. ललित पाटीलने स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर ‘मी पळालो नाही तर मला पळवून लावण्यात आलं आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांची नावं मी उघड करेन’, असा दावा एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलने केला. या सगळ्यामुळे ज्या पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर संशय घेतला जात होता. त्या पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, ललित पाटीलला न्यायालयात हजर केलं असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
‘होय मी पळालो नव्हतो तर मला पळवून लावण्यात आलं होतं. ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या या दाव्यामुळं ड्रग्ज तस्करीचं हे प्रकरण आणखी गंभीर बनलं आहे. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या ललितला बंगळुरुमधून पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. ललित पाटील पुण्यातून पसार झाल्यानंतर साकी नाका पोलिसांनी नाशिकमधील ललित पाटीलचा मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला होता. त्यावेळी अटक केलेल्या एका आरोपीशी ललित पाटील मोबाईलवरून संपर्क साधत होता. त्यातून पोलिसांना सुगावा लागला आणि ललितला बंगळुरुहून चेन्नईला जाताना पोलिसांनी अटक केली.
पुणे पोलिसांनी ललिताचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातून अटक केली तेव्हा ललित नेपाळला पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला पण पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील वेगवगेळ्या राज्यांमध्ये फिरत राहिला. तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चेन्नईवरुन ललित श्रीलंकेला जाणार होता, अशी माहिती मिळत आहे.
ललितचा पत्ता पोलिसांना कसा कळाला?
मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून ललितच्या साथीदारांना अटक केली. त्यापैकी एकाची माहिती पोलिसांनी सार्वजनिक केली नाही. त्याचा मोबाईल फोनही पोलिसांनी सुरु ठेवला आणि कधीना कधी ललित त्याच्या मोबाईलवर फोन करेल, या आशेने लावलेला हा सापळा होता आणि तसंच झालं. आपला हा साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे हे माहित नसल्यानं ललित पाटीलने मोबाईलवरून त्याला संपर्क केला आणि त्यामार्फत ललित कुठे आहे? याचा पत्ता पोलिसांना समजला.
पुणे पोलिसांनी चांगली संधी गमावली?
मुंबई पोलिसांना जे जमलं ते पुणे पोलिसांना का जमलं नाही? असाही प्रश्न विचारला जात आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून आधीच पुणे पोलीस दलातील नऊ पोलीसांना निलंबित करण्यात आलं आहे त्यामुळे डागाळली गेलेली प्रतिमा ललित पाटीलच्या मुसक्या आवळून सुधारण्याची संधी पुणे पोलिसांना होती. मात्र पुणे पोलिसांनी ही संधी देखील गमावली.
खरं तर ते पुणे पोलिसांनीच ललित पाटीलचं ससून रुग्णालयातून चालणारं ड्रग रॅकेट उघडकीस आणलं. मात्र ललितसारखा अट्टल गुन्हेगार कधीही निसटून जाऊ शकतो, याचं गांभीर्य न समजल्याने पुणे पोलीस गाफील राहिले. त्यानंतर ललितच्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर ललितला अटक करण्याच्या जवळ पुणे पोलीस पोहचले होते. मात्र पुणे पोलीस दलाच्या अंतर्गत गट बाजीतून ही बातमी लिक झाली आणि पुणे पोलीसांची संधी हुकली.
दावे प्रतिदावे आणि आरोप-प्रत्योरोप…
मात्र ललित पाटीलच्या अटकेनंतर आणि त्यानं केलेल्या दाव्यानंतर विरोधकांच्या आरोपांना आणखी धार आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या मदतीने ससूनमध्ये तळ ठोकून होता, असं म्हटलंय. या मंत्र्याचा जवळचा एक आयुर्वेदिक डॉ. ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांचा स्वीय सहाय्य्क म्हणून ससूनचा कारभार पाहत असल्याचीदेखील चर्चा रंगत आहे. दादा भुसे आणि शंभूराजे देसाई या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावताना आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणायचा इशारा दिला आहे.
ललित पाटीलच्या ससूनमधून पळून जाण्यानं जेवढे पुणे पोलीस, येरवडा कारागृहाचं प्रशासन आणि ससून रुग्णालयाच व्यवस्थापन या सगळ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. ललित पाटीलच्या पकडला गेल्यावर हा संशय निवळेल अशी शक्यता होती. मात्र झालं उलटंच ललिताच्या दाव्यामुळं या सगळ्यांबद्दलचा संशय आणखीनच गडद झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची चौकशी करण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानंतर देखील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
अनुत्तरित असलेले प्रश्न?
-ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील ललित पाटील कुणाच्या आशीर्वादाने ससूनमध्ये चार महिने ठाण मांडून होता?
-ललित पाटीलवर उपचार करणारे सहा डॉक्टर नक्की कोण होते आणि ते नेमके कोणते उपचार ललित पाटीलवर करत होते?
-ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस कुठल्या डॉक्टरांनी केली?
-ललित पाटीलसारखे गंभीर आरोपी ससूनमध्ये महिनोन्महिने कसे राहू शकतात?
ललित पाटीलच्या अटकेकनंतर आणि त्याने केलेल्या दाव्यानंतर तरी या प्रश्नांची उत्तरं मिळतील ही सर्व सामान्यांना अपेक्षा आहे. मात्र सामान्यांची अपेक्षा भाबडी आशा ठरू नये, यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे.
ड्रग्ज रॅकेटचे गॉडफादर कोण?
ललित पाटीलच्या ड्रग्ज रॅकेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरुणाईला पडलेला नशेचा घट्ट विळखा मोठा आहे. शेकडो कोटी रुपयांचं मेफेड्रोन महाराष्ट्रात विकलं जातंय हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं हे प्रकरण नेहमीच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये हरवून जाऊ नये, ही सामान्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं राजकारणासाठी नाही तर तरुण पिढीला असलेला नशेचा धोका टाळण्यासाठी ललित पाटीलचे पोलीस दलातील ससून रुग्णालयातील आणि असतीलच तर राजकारणातील देखील जे कोणी गॉडफादर असतील ते गॉडफादर समोर येणं गरजेचं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांचा निशाणा
[ad_2]