( प्रगत भारत । pragatbharat.com)
Dhantrayodashi 2023 : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच या दिवशी खरेदीला खूप महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी लोक सोने, चांदीच्या वस्तू आणि भांडी खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात अशी मान्यता आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? धनत्रयोदशीला तब्बल 50 वर्षानंतर दुर्मिळ योग असणार आहे.
50 वर्षानंतर दुर्मिळ योग
वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ संयोग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी यम पंचक शिववास आणि प्रदोष व्रत यांचा योगायोग आहे, हा योग 50 वर्षांनंतर तयार होत आहे. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील, अशी मान्यता आहे. धनू, मकर, मेष, कन्या या राशींना चांगला लाभ या दिवशी मिळू शकतो.
पूजेचा शुभ मुहूर्त कधी?
धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त हा 12 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरला 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर लक्ष्मी पूजेचा मुहूर्त सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी सुरू होणार असून 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे.
झाडू का खरेदी करतात?
धनत्रयोदशीला दागिन्यांसह पैश्यांना देखील महत्त्व आहे. तसेच झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते, अशी मान्यता देखील आहे. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते. घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते, असं देखील लोक मानतात. नवीन घरात प्रवेश करताना झाडू घेऊनच प्रवेश करणे शुभ मानलं जातं, त्यामुळे झाडूला देखील महत्त्व आहे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)