( प्रगत भारत । pragatbharat.com)
China mysterious pneumonia : संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीतून सावरण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी गेला. असं असूनही ही महामारी अद्यापही पूर्णपणे नामशेष झालेली नाही. त्यातच आता जागितक स्तरावर आरोग्य विभागाची चिंता वाढवणाऱ्या आणखी एका संसर्गानं सर्वांच्याच जीवाला घोर लावला आहे.
इथं जग कोरोनातून सावरत असतानाच तिथं एका रहस्यमयी आजारानं डोकं वर काढल्याची चर्चा आता जोर धरत आहे. फक्त चीनच नव्हे, तर आता जगभरात या संसर्गाचा फैलाव होताना दिसत आहे. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार चीनमागोमाग आता अमेरिकेमध्येही न्युमोनियाच्या या रहस्यमयी संसर्गाचा फैलाव झाल्याचं म्हटलं जात आहे. चीनमध्ये या विषाणूजन्य संसर्गाला सध्या ‘मिस्ट्री व्हायरस’ म्हणून संबोधलं जात आहे. भारतात अद्याप या संसर्गाचे रुग्ण आढळले नसले तरीही नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या संसर्गाला ‘व्हाइट लंग सिंड्रोम’ असं नाव दिलं आहे. हळुहळू हा संसर्ग संपुर्ण जगाला विळख्यात घेत असल्याचं भीतीदायक वास्तक आता जाहीरपणे मांडलं जात असून, याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना संभवतोय. या संसर्गासाठी ‘माइकोप्लाज्मा निमोनिया बॅक्टेरिया’ जबाबदार असल्याचं म्हणत या संसर्गामुळं व्यक्तीच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो अशी धक्कादायक बाब निरीक्षणातून निदर्शनास आलीये. एक्स रेमुळं या संसर्गाचं भीतीदायक रुप समोर आलं असून, आता आरोग्य यंत्रणांनासुद्धा खडबडून जाग आली आहे.
काय आहेत लक्षणं?
उपलब्ध माहितीनुसार एक्स रे काढल्यानंतर हाती येणाऱ्या रिपोर्टमध्ये सहसा फुफ्फुसं काळसर दिसतात. पण, या विषाणूच्या संसर्गामुळं फुफ्फुसांचा रंग पांढरा दिसत असल्यामुळं या आजाराला व्हाईट लंग सिंड्रोम हे नाव मिळालं आहे. या संसर्गाच्या लक्षणांमध्ये श्वसनास त्रास होणं, छातीत सतत वेदना होणं, सतत थकवा येणं, सर्दी- खोकला होणं, हलका ताप येणं, थंडी भरणं या आणि इतर लक्षणांचा समावेश आहे.
लहान मुलांमध्ये या संसर्गाचं प्रमाण तुलनेनं जास्त असण्यामागचं कारण आहे त्यांची कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. 5 ते 10 व्या वर्षादरम्यानच्या काळात लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते. याच काळात एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. कोरोनाप्रमाणंच या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजणं गरजेचं आहे. ज्यामध्ये हात स्वच्छ करणं, ताप, सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि मास्कचा वापर करणं या उपायांचा समावेश आहे.