[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
1st January In History : इतिहासात प्रत्येक दिवसाला एक महत्त्व असते ते त्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांमुळे. या ऐतिहासिक घटनांचा परिणाम तत्कालीन समाजावर होतोच शिवाय भविष्यातही त्याची नोंद घेतली जाते. आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला होता. तर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा आजच्या दिवशी सुरू केली होती. जगाच्या इतिहासात अजरामर घटना असलेली क्युबन क्रांतीदेखील आजच्या दिवशी घडली होती.
1664 : सुरतेच्या लुटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल (Chhatrapati Shivaji Maharaj)
मोगल सरदार शाहिस्तेखान सलग तीन वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुजरातमधील सुरत शहर सुरत शहर लुटण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. सुरतेतील आर्थिक आणि भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला. त्यासाठी 1 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सूरतेत थडकून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम यशस्वी केली होती.
1818 : कोरेगाव भीमाच्या लढाईत पेशव्यांचा निर्णायक पराभव
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांमध्ये ही लढाई झाली होती. भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 25 हजाराच्या सुमारास सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता
कॅप्टन फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटीश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महारांना,अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले असल्याचे म्हटले जाते. ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला.
1848 : भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
महात्मा जोतीबा फुले यांनी अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनरीं मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. तेव्हापासून भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्राबाई फुलेंचे नाव घेतले जाते.
मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या या शाळेला सनातनी, कर्मठांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, या विरोधाला न जुमानता शाळा सुरू राहिली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली.
1862 : भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1862 रोजी भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. त्याआधी 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्याला मान्यता देण्यात आली होती. आयपीसी म्हणून प्रसिद्ध भारतीय दंड संहिता हा भारताचा प्राथमिक गुन्हेगारी कायदा आहे, जो गुन्हेगारी कायद्यातील प्रत्येक भौतिक बाबी विचारात घेतो. 1862 पासून या कायद्यात बर्याच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. हे देशातील सर्व संभाव्य गुन्हे आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेची व्याख्या करते.
1918: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म
आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा आज जन्मदिन. शांताबाई यांनी बी. ए. पदवी शिक्षण झाल्यावर ट्रेनिंग होऊन काही वर्षे नोकरी केली. शांताबाई दाणी यांनी आपल्या अफाट कार्यशक्तीच्या जोरावर तत्कालीन काळात देशातील क्रमांक चारचा पक्ष असलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेतृत्व केले होते. दादासाहेब गायकवाड आणि इतर पुरूष नेत्यांच्या बरोबरीने जोमाने राजकीय कार्ये केली.
शेकाप ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा प्रवासही त्यांनी अगदी लीलया पार केला. 1946 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने आयोजित केलेले महिला संमेलनाचे अध्यक्षपद असो किंवा रायपूरमध्ये जाउन केलेले आंदोलन असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 1957 साली झालेली स्थापना असो किंवा दादासाहेबांनी उभारलेला भूमिहिनांचा लढा यशस्वी करणे असो शांताबाईंनी प्रत्येक आघाडी नेटाने लढविली, परंतु शांताबाईंनंतर चळवळीत सर्वस्व झोकून देणारे महिला नेतृत्व मिळाले नाही. 1948 मध्ये शांताबाई शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस झाल्या. त्यांना एका सत्याग्रहात येरवड्याला व नंतर जबलपूरला एक महिन्याचा तुरुंगवास त्यांना सोसावा लागला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
1951 : अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस (Nana Patekar)
अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म मुरुड-जंजिरा ( जि. रायगड ) येथे झाला. नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी खूप कमी वेळात आपली लोकप्रियता वाढवली आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त नाना पाटेकरांनी अनेक मराठी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपला काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री आणि राष्ट्रीय चित्रपट या मानाच्या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले.
1959 : क्युबन क्रांती दिवस
फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील विद्रोही सैनिकांनी क्यूबाचा हुकूमशहा फ्लुजेन्सियो बतिस्ता यांचा पाडाव केला. क्युबन क्रांतीकारकांचा गनिमी कावा आणि राजवटीविरोधात लोकांनी क्रांतीला दिलेला पाठिंबा यामुळे अधिक काळ आता सत्तेत राहता येणार नसल्याचे लक्षात आल्याने हुकूमशहा फ्लुजेन्सियो बतिस्ता देश सोडून पळून गेला. त्यानंतर क्युबात क्रांतीकारकांनी सत्ता हाती घेतली.
फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वातील क्रांती ही लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाला नवीन वळण लावणारी युगप्रवर्तक घटना आहे. या क्रांतीने लॅटिन अमेरिकेत पहिली आणि एकमेव साम्यवादी सत्ता अस्तित्वात आली. तरीही ती साम्यवादी नेतृत्वाखाली अथवा पक्षाने घडवून आणलेली क्रांती नव्हती. क्रांतीत सहभागी असणारे चे गव्हेरा आणि फिडेल यांचे बंधू राऊल कॅस्ट्रो यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव होता.
कास्ट्रो हा जहाल, साम्राज्यशाहीविरोधी आणि राष्ट्रवादी होता. सर्व पददलित, शोषित आणि गरीब जनतेचे आपणच प्रतिनिधी आहोत, असे तो समजत असे. जुलूम, सामाजिक अन्याय आणि भ्रष्टाचार यांपासून मुक्त असा नवीन क्यूबा निर्माण करण्याच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने तो प्रेरित झालेला होता. आपली क्रांती ही खास क्यूबन क्रांती आहे, असे कास्ट्रो म्हणतो. क्यूबाच्या ताडमाडाच्या झाडांइतकीच ती क्यूबाच्या जमिनीतून निर्माण झाली असल्याचे कॅस्ट्रो यांनी म्हटले. क्युबन क्रांतीने अमेरिकेचे वर्चस्व झुगारुन दिले होते. तर, दुसरीकडे सोव्हिएत युनियनने मदतीचा हात पुढे केला होता. कालांतराने कॅस्ट्रो यांनी आपला पक्ष कम्युनिस्ट पक्षात विलीन केला.
क्युबन क्रांतीमुळे शिक्षण, आरोग्य मोफत करण्यात आले. सर्व व्यापाराचे राष्ट्रीयीकरण झाले. शिक्षणाचा प्रसार झाला. निरक्षरतेचे निर्मूलन करण्यात आले. तर, दुसरीकडे औद्योगिकीकरण, अमेरिका आणि इतर देशांकडून सुरू असलेले निर्बंधाचा सामनादेखील क्युबाला अनेक दशके करावा लागला.
1978 : एअर इंडियाचे विमान समुद्रात कोसळले
1978 मध्ये आजच्या दिवशी 213 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान समुद्रात बुडाले. सम्राट अशोक नावाचे हे बोईंग 747 विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात यांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले होते. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर लगेचच हा कटाचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
1842: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
1880: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
1883: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
1923: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
1923: अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म
1941: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
1995: जागतिक व्यापार संघटनेची ( WTO) स्थापना झाली.
[ad_2]