‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला ‘रवी तुझं…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी यांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाबद्दल सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. 

 ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकही या प्रिमिअर सोहळ्याला उपस्थित होता. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने रवी जाधव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने त्याला  ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. 

प्रसाद ओकची पोस्ट

“मैं अटल हूँ” – रवी जाधव यांनी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले. पण माझ्या मते “ मैं अटल हूँ “ हा रवीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे. पंकज त्रिपाठी ही आता व्यक्ती न राहता त्यांचे विद्यापीठ झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण “पाहिले”. पण पुन्हा एकदा मैं अटल हूँ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी धडा घेण्यासारखा आहे. 

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम. रवी जाधव, मेघना जाधव आणि पंकज त्रिपाठी यांच्यासह संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा..!!! रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!”, असे प्रसाद ओकने म्हटले आहे. 

प्रसाद ओकच्या या पोस्टवर रवी जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धन्यवाद प्रसाद ओक अशी कमेंट त्यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी हार्ट आणि हात जोडणारा इमोजीही शेअर केला आहे. त्यासोबतच प्रसादच्या या पोस्टवर चाहतेही विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, एकता कौल, पियुष मिश्रा, पायल नायर, दया पांडे, प्रमोद पाठक आणि पॉला मॅकग्लिन हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे रवी जाधव करत आहे. या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी  साकरत आहेत. 

Related posts