- राज्य शासनाच्या प्रशासन विभागाची घोषणा…
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२४) :- अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले आहे. या निर्णयाचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे.
प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण व श्रींची प्राणप्रतिष्ठा दि.२२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे. हा दिवस भारतीय साठी गौरवाचा आणि उत्सवाचा आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भजपाचे आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. तसेच, राज्यातील रामभक्त आणि विविध संघटनांनीही अशीच मागणी लावून धरली होती.
दरम्यान, केंद्र सरकारने दि. २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस शासकीय सुट्टीबाबत गुरूवारी घोषणा केली. त्यानंतर आज राज्य सरकारच्या प्रशासन विभागाने श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी अयोध्या येथे मंदिरात आगमन व प्राणप्रतिष्ठा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून, हा भारतीयांसाठी मोठा आनंदोत्सव व ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि हा दिवस सण-उत्सवाचा दिवस म्हणून घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री महोदय यांना केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तमाम रामभक्त आणि हिंदूत्ववादी देशवासीयांच्या वतीने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.
राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून हिंदू धर्म, संस्कृतीचा पुरस्कार करणारे प्रखर हिंदुत्ववादी सरकार काम करीत आहे. प्रभू श्रीराम यांना आराध्य दैवत मानणारे अनेक मंत्री सत्तेत आहेत. यातील अनेक नेत्यांनी कारसेवा देखील केली आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम जर पुन्हा आपल्या जन्मस्थानी विराजमान होणार असतील, तर त्या गोष्टीचा जल्लोष झालाच पाहिजे. सोमवारी, दि. २२ रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे आता उत्सव आणि दिवाळी जोरात साजरी होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो.
– महेश किसनराव लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.