[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ashadhi Wari 2023 : पुण्यात येत्या दोन दिवसांनी आळंदी आणि देहूच्या पालख्या दाखल होणार आहे. त्यासाठी पुण्यात जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. नाना पेठ परिसरात तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता पुणे आरटीओनेदेखील त्यांच्या डाईव्ह ब्रेक टेस्ट ट्रॅकमध्ये काही प्रमाणात बदल केले आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये आणि टेस्ट सुरळीत पार पडावी यासाठी वाहन चाचण्या रिशेड्यूल केल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आपल्या कामकाजात बदल केले आहेत. विशेषत: आळंदी रोडवर असलेल्या ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील कायमस्वरुपी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी आणि वाहन तपासणी प्रक्रियेत तसेच डाईव्ह ब्रेक टेस्ट ट्रॅकमध्ये बदल करण्यात आले आहेत.
आळंदी रोडवरील चाचणी मैदानातील ड्रायव्हिंग टेस्ट आता 17 जूनला
12 जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक आळंदी रोडवरील चाचणी मैदानावर ठेवण्यात येणार असून, तेथे नियमित वाहन तपासणी आणि वाहन चालवण्याचा परवाना चाचणी घेण्यात येणार नाही. ज्या नागरिकांच्या या दिवशी पूर्वनियोजित चाचण्या ठरल्या आहेत, त्यांच्यासाठी वाहन तपासणी आणि ड्रायव्हिंग चाचणी 17 जून रोजी पुन्हा शेड्यूल केली जाणार असल्याचं आरटीओने सांगितलं आहे.
12 जून रोजी ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील प्रवेश तात्पुरता बंद
त्याचप्रमाणे 12 जून रोजी तुकाराम महाराजांची पालखी जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे निघेल. परिणामी, ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश तात्पुरता बंद केला जाईल, ज्यामुळे निश्चित परवाना चाचणीसाठी अनुसूचित अर्जदारांची गैरसोय होईल. 12 जून रोजी कायमस्वरुपी ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी अपॉईंटमेंट असलेल्यांना आता त्याऐवजी 17 जून रोजी उपस्थित राहावे लागेल.
नाना पेठेतील रस्त्यांची सजावट
पुण्यात वारीसोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. नाना पेठेतील मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. त्यापूर्वी या सोहळ्यासाठी नाना पेठेत सगळ्या विठुरायाच्या भक्तांकडून पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाना पेठेतील रस्त्यांची सजावट करण्यात येत आहे. शिवाय पुण्यातील अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी राहण्याची उत्तम सोयदेखील करण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज
यंदा वारीच्या काळात भरपूर प्रमाणात ऊन असणार आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात किंवा उष्माघाताचादेखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी उत्तम आरोग्य सुविधा देण्याचीदेखील सोय करण्यात आली आहे. आता फक्त अनेकांना पालखी पुण्यात दाखल होण्याची आस लागली आहे.
[ad_2]