नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या बालकांना सोन्याची अंगठी

चेन्नई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय तामिळनाडू भाजपाने घेतला आहे. त्यासाठी आम्ही चेन्नईतील काही सरकारी रुग्णालये निवडली आहेत. तेथे पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्यात दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मत्स्य पालन, सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. याशिवाय अन्य योजना अंतर्गत ७२० किलो मासे मोफत वाटले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी वाटण्यासाठी येणारा खर्च कोण करणार, असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा त्याला उत्तर देण्याचे मुरुगन यांनी टाळले. प्रत्येक मुलाला २ ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली जाईल. तिची किंमत ५ हजारांच्या आसपास असेल. मोफत वाटण्याची ही रबडी नाही. पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्मलेल्या बालकांचे यातून आम्ही स्वागत करणार आहोत. १७ सप्टेंबरला १० ते १५ बालके या रुग्णालयात जन्मण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. आम्हाला ते माहित आहे. परंतु ते ७२ वर्षांचे होणार असल्याने त्यानिमित्त ७२० किलो मासे मोफत वाटले जाणार आहेत. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मतदारसंघात हे मासे वाटले जातील, असे त्यांनी सांगितले.

Related posts