शाळेत रेलिंगवरून घसरताना तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदिर या शाळेत जिन्यातील रेलिंगवर घसरगुंडी खेळताना पडून आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

सार्थक अनिल कांबळे (वय १३, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक हा हुतात्मा चापेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. तो सकाळी अकराच्या सुमारास शाळेच्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर घसरगुंडी खेळत होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राने त्याला तू येथे खेळू नकोस खाली पडशील, तुला लागेल असे म्हणत त्याला रेलिंगवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सार्थक तसाच खेळत राहिले. त्याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो इमारतीच्या तळमजल्याच्या डक्टमध्ये पडला. तो पडल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शाळेत पालकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी या जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Related posts