रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या – डॉ. सदानंद मोरे

ज्या लोक प्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेची कामे होतात ते लोकप्रतिनिधी कायम निवडून येतात. रामकृष्ण मोरे यांनी शहरातील अनेकांना घडवले. पण त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्याचे काम फक्त आप्पांनीच केले, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केल्या.मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सिने अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी डॉ. मोरे हे बोलत होते.कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, नामदेवराव जाधव, कविचंद भाट, नारायण बहिरवडे, निलेश तरस, मधुकर कंद, ज्ञानेश्वर दळवी, रवी नामदे, उदय आवटे, धनाजी बारणे, माऊली घोगरे, बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, ” शिवाजी महाराज जिथे घडले त्या भागातले आपण आहोत, याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. इथल्या लोकांना जो संसदेत मांडतो तो खरोखर महान असतो. प्रभू श्रीरामांचा पहिला राज्याभिषेक महाराष्ट्रात झाला. नाशिकच्या परिसरात असताना सीता मातेचे अपहरण झाले. रावणाचा वध करण्यासाठी श्रीराम लंकेकडे गेले. ही माहिती भरताला समजली आणि तो सर्व सैन्य घेऊन लंकेकडे निघाला. पण तो महाराष्ट्रात आला तेंव्हा श्रीराम सीता मातेला घेऊन परत आले होते. त्यावेळी तिथे प्रभू श्रीरामांचा पहिला अभिषेक झाला.सातवाहन राजांचे मूळचे मावळ येथील आहेत. ते पुढे जुन्नर आणि त्यानंतर पैठणला गेले. सातवाहन राजे मूळचे मावळचे असल्याने त्यांचे या भागात स्मारक झाले पाहिजे. तो इतिहास आपण पुढे आणला पाहिजे. प्राकृत मराठी भाषेचे पुढचे स्वरूप हे आताची मराठी भाषा आहे. हे शासनाने लक्षात घेतल्यास मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी आशा देखील मोरे यांनी व्यक्त केली.खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डॉ. रामकृष्ण मोरे यांच्यामुळे झाली. कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा तर तो रामकृष्ण मोरे यांच्यासारखा असावा. केवळ हव्यासापोटी राजकारणात आलो तर आपण चिरकाल टिकू शकणार नाही, हे बाळकडू त्यांनी मला दिले. मी 22 वर्ष महापालिकेत काम केले. स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, गटनेता म्हणून काम केले. तिथे माझ्या राजकीय कारकिर्दीची चांगली पायाभरणी झाली. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमाच्या जोरावर मी आज संसदेत चांगल्या प्रकारे काम करू शकत आहे.

माझ्या प्रामाणिकपणे काम करण्यामुळे जनतेने मला स्वीकारले. अनेक वर्ष काम करत असताना आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो. हा आशय घेऊन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक चांगल्या लोकांना पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन अनेकजण चांगल्या कामांसाठी एकत्र येत आहेत हेच माझ्या यशाचे गमक आहे. शहरे वाढत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम ठिकाणी अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी देखील मला आजवर भरपूर काम करता आलं याचा आनंद वाटतो, असेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.सिने अभिनेते अशोक समर्थ म्हणाले, “लोकांच्या समस्या सातत्याने आप्पा बारणे संसदेत मांडत आहेत. त्याच बरोबरीने समाजात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्याचा देखील त्यांचा उपक्रम आनंदाचा वाटतो. प्रत्येकाला सकस वाचता, बोलता, खायला आलं पाहिजे. जीवनातला हा सकसपणा खूप महत्वाचा आहे आप्पा बारणे यांनी सकस विचार असलेल्या युवकांना, नागरिकांना जोडून आपले काम आरंभले आहे. निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. आपण आपला आनंद सुंदर सृष्टीत शोधा. भेसळयुक्त जगणं सोडून देण्याचा आग्रह देखील त्यांनी केला.नामदेवराव जाधव म्हणाले, “श्रीरंग बारणे हे सतत काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. ते पुढच्या टर्मला लोकसभेचे सभापती व्हावेत याच त्यांना शुभेच्छा.”

विश्वजीत बारणे यांनी प्रास्ताविक केले. श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून लोकाभिमुख कर्तव्यसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वांचा, संस्था यांचा गौरव करण्याचा उपक्रम मागील 16 वर्षांपासून सुरू आहे. अनेक मान्यवरांचे आशीर्वाद या माध्यमातून मिळाले आहेत. हनुमंत माळी यांनी आभार मानले.

‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा झाला सन्मान-शिक्षणरत्न पुरस्काराने धनंजय वर्णेकर, वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प जालंधर महाराज काळोखे, आरोग्य भूषण पुरस्काराने डॉ. अविनाश वाचासुंदर, उद्योगरत्न पुरस्काराने राकेश सोनिगरा, योग भूषण पुरस्काराने वैशाली देशमाने, पर्यावरण भूषण पुरस्काराने डॉ. अजित जगताप, शिक्षणरत्न पुरस्काराने आरती भेगडे, शिक्षणरत्न पुरस्काराने नीता मोहिते, कृषीरत्न पुरस्काराने खंडू भोंडवे, समाज भूषण पुरस्काराने सुर्यकांत ताम्हाणे, क्रीडारत्न पुरस्काराने खुशी मुल्ला, समाज भूषण पुरस्काराने रामदास माळी, बसवराज कनजे, दुर्गरत्न पुरस्काराने शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अॅण्ड अॅडव्हेचर क्लब, आदर्श कामगार युनियन एसकेएफ कामगार युनियन, समाजसेवा भूषण पुरस्काराने सातारा मित्र मंडळ, आदर्श सोसायटी पुरस्काराने गणेशम 2 सोसायटी, रामतीर्थ हौसिंग सोसायटी, रिचमंड सोसायटीचा सन्मान करण्यात आला.

Related posts