[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
‘लाँच व्हेइकल मार्क ३’(एलव्हीएम ३) रॉकेटने शुक्रवारी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरील दुसऱ्या लाँच पॅडवरून यशस्वी उड्डाण केले. पुढील १६ मिनिटांमध्ये निर्धारित मार्गावरून अचूक मार्गक्रमण करून त्याने ३९०० किलो वजनाच्या ‘चांद्रयान ३’ला पृथ्वीभोवती दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित केले. ‘एलव्हीएम ३ एम ४’ ही मोहीम यशस्वी झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी जाहीर केले. ‘चांद्रयान २’ मोहिमेतून चंद्रावर उतरण्याचा प्रयोग २०१९मध्ये अयशस्वी ठरल्यानंतर इस्रोच्या विविध केंद्रांनी त्या मोहिमेतील उणिवा शोधून काढल्या.
‘यानाची स्थिती व्यवस्थित’
‘चांद्रयान ३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांशी बोलताना सोमनाथ म्हणाले, ‘चांद्रयान ३’ला पृथ्वीभोवती १७० बाय ३६५०० किमीची अपेक्षित कक्षा प्राप्त झाली असून, यानाचे आरोग्यही व्यवस्थित आहे. येत्या पंधरवड्यात यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा चार वेळा विस्तारून त्याला चंद्राकडे मार्गस्थ केले जाईल. १ ऑगस्टला ‘चांद्रयान ३’चंद्राच्या कक्षेत पोचण्याची अपेक्षा आहे. चंद्राभोवती सुरुवातीला दीर्घ वर्तुळाकार असलेली कक्षा कमी करून १०० किमी वर्तुळाकार केली जाईल. १७ ऑगस्टला प्रोपलजन मॉड्यूलपासून लँडर विलग होईल. त्यानंतर २३ ऑगस्टला संध्याकाळी ५.४७ वाजता लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल.’
विविध प्रयोग होणार
‘चांद्रयान ३’ मोहिमेत हे सर्वच टप्पे महत्त्वाचे असून, या सर्व प्रक्रिया अचूक पार पडल्या, तरच ‘चांद्रयान ३’ चांद्रभूमीवर अलगद उतरून मोहीम यशस्वी ठरेल. इतर देशांनी या आधी न केलेले प्रयोग भारतीय मोहिमेतून प्रथमच केले जाणार असून, चंद्राविषयीची अनेक अज्ञात तथ्ये त्यातून समोर येतील. इस्रोची सर्व केंद्रे; तसेच देशभरातील उद्योगांनी एकत्रितपणे ही मोहीम प्रत्यक्षात आणली,’ असेही सोमनाथ म्हणाले.
– ‘चांद्रयान ३’ला पृथ्वीभोवती १७० बाय ३६५०० किमीची अपेक्षित कक्षा प्राप्त
– येत्या पंधरवड्यात यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा चार वेळा विस्तारून त्याला चंद्राकडे मार्गस्थ केले जाईल.
– १ ऑगस्टला ‘चांद्रयान ३’चंद्राच्या कक्षेत पोचण्याची अपेक्षा आहे.
– २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४७ वाजता लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल.
प्रक्षेपण पाहण्यासाठी
नागरिकांची गर्दी
चांद्रमोहिमेचे ऐतिहासिक प्रक्षेपण पाहण्यासाठी देशभरातून सुमारे दहा हजार नागरिक श्रीहरिकोटा येथे उपस्थित होते. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या माजी अध्यक्षांनीही ‘चांद्रयान ३’च्या प्रक्षेपणाची प्रक्रिया नियंत्रण कक्षातून अनुभवली.
[ad_2]