‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा अग्रस्थानी आहे. त्यात आता भारतीयांनीच बहिष्कार टाकण्यास सुरुवात केल्याने पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या मालदीवचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळेच आता द मालदीव असोसिएनश ऑफ टुरिझम इंडस्ट्री या पर्यटनविषयक संस्थेनं एक पत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

कठोर शब्दांमध्ये निषेध करतो

मालदीवमधील पर्यटन व्यवसायाशीसंबंधित कंपन्यांची आणि कंपनी मालकांची संघटना असलेल्या द मालदीव असोसिएनश ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने (‘माटी’ने) आपल्याच देशातील मंत्र्यांचा निषेध केला आहे. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीयांचा देशातील काही उपमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून अपमान केला असून आम्ही त्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध करतो,” असं ‘माटी’ने म्हटलं आहे.

भारत कायमच जवळचा सहकारी

“भारत हा आमच्या सर्वात जवळचा शेजारी आणि सहकारी देश आहे. आमच्या इतिसाहामध्ये आमच्या जेव्हा जेव्हा संकटं आली तेव्हा सर्वात आधी मदतीला धावून येणारा देश हा भारतच आहे. आमच्याबरोबर भारत सरकार आणि भारतीयांनी जपलेल्या या संबंधांचा आम्ही फार सन्मान करतो,” असं पर्यटन व्यवसायाशीसंबंधित मालकांच्या संस्थेनं म्हटलं आहे.

भारताचं योगदान फार महत्त्वाचं

“मालदीवमधील पर्यटन व्यवसायामध्ये सातत्याने आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या देशांमध्ये भारताचं महत्त्व फार आहे. कोरोनानंतर आमच्या देशातील पर्यटन सुरु झाल्यानंतर या व्यवसायाला बसलेला फटका भरुन काढण्यासाठी भारताने फार महत्त्वाचं योगदान दिलं आहे. कोरोनानंतर भारत हा मालदीवमधील पर्यटनासाठी सर्वात आघाडीची बाजारपेठ म्हणून समोर आला आहे,” असंही ‘माटी’ने म्हटलं आहे.

कळकळीची विनंती आहे की…

“आमची अशी कळकळीची विनंती आहे की दोन्ही देशांमध्ये मागील अनेक पिढ्यांपासून असलेले संबंधं असेच टिकून राहावेत. आपल्या चांगल्या नात्यांवर वाईट परिणाम करणाऱ्या नकारात्मक कृती अथवा विधानांचा आम्ही निषेध करतो,” असंही ‘माटी’ने स्पष्ट केलं आहे. मालदीवच्या व्यापाऱ्यांचं हे पत्र व्हायरल झालं असून आर्थिक नाकेबंदी झाल्यानंतर व्यापाऱ्याना अक्कल आल्याचं अनेक भारतीयांनी म्हटलं आहे.

Related posts